राजकीय

कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे वेगळी; निष्काळीपणा करू नका – आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन

पनवेल(प्रतिनिधी) कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोविड -१९ लसीकरण जनजागृती संदर्भात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांनी संवाद साधून कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे वेगळी आणि गंभीर आहे, मात्र घाबरू नका आणि निष्काळजीपणा करू नका, असे आवाहन नागरिकांना व शासनाला केले. तसेच आरोग्य व्यवस्था, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना होणारा त्रास, मदत, उपाययोजना आदी विषयांवर त्यांनी संवाद साधत नागरिकांना मोठा दिलासा दिला.

यावेळी त्यांनी संवाद साधताना म्हंटले कि, नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे उपचार घेणाऱ्या २४ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि त्यांच्या परिजनांवर दुःखाचे डोंगर पसरले आहे त्यांच्या परिवारासोबत संवेदना आहेत. गेलेला जीव परत येत नसतो पण हि बाब मनाला खूप वेदनादायी घटना आहे, असे सांगून शोक व्यक्त केला. तसेच अशा घटना घडू नये यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचेही अधोरेखित केले.

आज आपल्या अवती भोवती पाहिले तर कोविडमुळे अनेक लोकांची अवस्था गंभीर झाली आहे. रोजच्या रोज आपण पाहतो कि, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकं रुग्णांच्या उपचारार्थ प्रयत्न करून सुद्धा काही लोकांना मदत करता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बेड हवा आहे त्यासाठी पहिली धावपळ आणि ऍडमिट झाल्यानंतर रेमडीसीवीर इंजेक्शन, औषधोपचारासाठी पाठपुरावा, हि सगळी परिस्थिती आपल्या सर्वावर आली आहे. प्रचंड चिंतेचे वातवरण अवतीभोवती पहायला मिळत आहे. आणि मोठया प्रमाणात गोंधळाचे वातावरण आहे. आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, महापालिका, जिल्हा प्रशासन, केंद्र, राज्य सरकार करतेय काय? अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आपण एकमेकांना विचारतो. रायगड जिल्हयातील पनवेल आणि परिसरात आता दरदिवशी ८०० कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. उरण-पेण- अलिबाग सारख्या परिसरातही रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पनवेल परिसरातील विविध रुग्णालयात कोरोनाचे सहा हजार रुग्ण दाखल आहेत. या सर्व परिस्थितीत नव्या रुग्णांना बेड्स मिळत नाही. पनवेलमधील तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात १५० बेड्सची क्षमता आहे पण तेथेही १६० पेक्षा जास्त रुग्ण दाखल आहेत. तेथील डॉ. बसवराज लोहारे व त्यांचे सहकारी मेहनतीने लोकांना सेवा देण्याचे काम करीत आहेत. महापालिकेने सिडकोच्या माध्यमातून कळंबोली येथे उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये ७२ बेडची क्षमता आहे तेही पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. महापालिकेने खाजगी ३४ तर ग्रामीण भागात तहसीलदारांनी १२ रुग्णालयांना कोविड उपचाराची मान्यता दिली आहे. असे असतानाही बेड्स मिळत नाही हा आपल्या सर्वांचा मोठा प्रश्न आहे. अशावेळी महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पावले उचलली पाहिजेत हि सर्वांची भावना आहे. आणि महापालिकेच्या माध्यमातून तसे प्रयत्न होत आहेत. मी, जिल्हाधिकारी, पालकमंत्री प्रयत्न करीत आहेत. महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सहकारी प्रयत्न करीत आहेत.

एमजीएम हॉस्पिटलमधील २५० बेड्स महात्मा फुले आरोग्य योजनेत वापरले जात आहेत. आणखी २०० बेड्स साठीचा करार महापालिकेमार्फत केले जाणार आहेत. आधी १०० बेडचा त्यानंतर १०० बेड्सचा टप्पा केला जाणार आहे. येत्या आठवड्यात कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे. आणि त्या संदर्भातील आपला पाठपुरावा सुरु आहे. पनवेलमध्ये जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी राज्य शासनाकडे मागणी केली आहे आणि त्या अनुषंगाने आता महापालिकेच्या माध्यमातून हि मागणी पुढे गेली हि मागणी मान्य झाली आणि आता ८०० बेड्सच्या कोविड सेंटरसाठी कळंबोली जवळील सीसीआय गोडाऊनचा ताबा घेण्यात आला आहे. आता तेथे काम सुरु होणार असून सिडकोच्या माध्यमातून त्यासाठी निधी दिला जावा असे शासनाने आदेश दिले आहेत. ८०० बेड्स असल्याने कार्यान्वित व्हायला वेळ जाणार आहे पण लवकरच त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात व्हावी हि अपेक्षा आहे.

रेमडीसीवरच्या बाबतीत सर्वच चिंतेत आहेत. एक आठवड्यापूर्वी शासनाने याबाबतीत निर्णय घेतला आहे. डॉक्टर रुग्णांच्या उपचारासाठी या इंजेक्शनची मागणी करतात पण हे इंजेक्शन सहज उपलब्ध होत नसल्याने त्याचा काळाबाजार होत असल्याचे सर्वत्र पहायला मिळत आहे.किमान कोविड रुग्णांसाठी तरी शासनाने त्या-त्या हॉस्पिटलला योग्य प्रमाणात इंजेक्शनचा पुरवठा केला पाहिजे, त्यामुळे सहजपणे उपलब्ध होऊन काळाबाजार होणार नाही. या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी तसेच अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांशी माझा सतत पाठपुरावा सुरु आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

आताचा कोरोना स्ट्रेन पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे रुग्ण दाखल झाल्यावर डॉक्टर रेमेसीडीवर रेकोमेन्डेड करतात आणि त्याचे प्रिस्प्रिक्शन घेऊन रुग्णांचे नातेवाईक पनवेल, नवी मुंबई, मुंबई, पुणे या ठिकाणी सैरावैरा फिरत असतात. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना फार मोठा त्रास होत असल्याने या संदर्भात शासनाने लवकरात लवकर मार्ग काढला पाहिजे, असाही त्यांनी उल्लेख केला. आजच्या घडीला दररोज कोविड संदर्भातील घटना पाहता शासनाच्या माध्यमातून आम्हाला काय मिळतेय कि नाही असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. या संदर्भात गेल्या सहा महिन्यातील व्यवस्था राज्य शासनाच्या माध्यमातून आहे ती ठेवण्यात आली असती तर आज इतक्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागले नसते. मागील वर्षाच्या तुलनेत आताचा कोविड स्ट्रेन वेगळा आणि गंभीर स्वरूपाचा आहे. असे असले तरी घाबरू नका मात्र कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्या संदर्भातील सर्व नियमांचे पालन करा, अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. तरुणांमध्ये झपाट्याने प्रसार होत आहे, त्यामुळे कोरोनाची लागण होऊ नये याची काळजी घ्या. यापुढे रुग्णसंख्या वाढत राहिली तर शासनाला लॉकडाऊनचाच पर्याय राहील आणि ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे लॉकडाऊनमुळे अतोनात हाल होतील त्यामुळे टाळण्यासाठी नियमांचे पालन करा, असे पुनर्रआवाहन त्यांनी केले.

७० टक्के बाजरपेठ बंद आहे तरीही रुग्णांची संख्या वाढतच आहे, लॉक डाऊन हा शेवटचा पर्याय आहे, लॉक डाऊन हा सोल्युशन नाही तर प्रसार रोखणे आहे. त्यामुळे तशी उपाययोजना झाली पाहिजे. गेल्या वर्षी विविध संघटनांनी पुढे येऊन आपापल्या परीने मदतीचा हात पुढे केला. त्याचप्रमाणे या काळातही तरुणांनी पुन्हा एकदा पुढाकार घेऊन हातावर पोट असलेल्यांना मदत करावी. तसेच सोसायटी, गल्ली, गाव, अशा विविध ठिकाणी तरुणांनी कमिटी तयार करून आपल्या परिसरात विना मास्क कुणी फिरणार नाही याची दक्षता घ्यावी.

नागरिकांना या कठिण काळात भाजपचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी अखंडपणे मदतीचे काम केले. कोणालाही मदतीची गरज लागल्यास आमचे शहरातील पक्ष कार्यालये आहेत, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करावा किंवा माझ्याशी संपर्क करावा, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. नागरिकांच्या हितासाठी केंद्र सरकार मदत करीत आहे. सुरुवातीला गरीब कल्याण योजना, नंतर आत्मनिर्भर योजना असे पॅकेज देण्याबरोबरच देशात लसी उत्पादन सुरु केले तसेच परदेशातील लसींना मान्यता देण्यात आली आहे. तरूणांना लस देण्याची मान्यता देण्यात आली आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाला आपले कुटुंब प्रिय आहे, पुन्हा आलेले हे छोटे संकट नाही, निष्काळजीपणा महागात पडेल, त्यामुळे सर्वानी काळजी घेतली पाहिजे. एकमेकांना मदत करत हे संकट दूर करण्याचे सामर्थ्य प्रत्येकाने अंगिकारले पाहिजे, असेही त्यांनी संवादात अधोरेखित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button