पावसाळीपूर्व स्थितीचा आढावा घेत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कार्यपूर्ततेसाठी दिली 15 मे डेडलाईन
मागील वर्षी पावसाळी कालावधीत आलेल्या अडचणींपासून बोध घेऊन यावर्षी त्यादृष्टीने आत्ताच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर द्यावा असे निर्देशित करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी पावसाळापूर्व कामांसाठी 15 मे पर्यंतची डेड लाईन दिली. मान्सून 2021 पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने विविध प्राधिकरणांसोबत कोव्हीड काळ लक्षात घेता व्हिडीओ कॉन्फरन्सींगव्दारे आयोजित शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीप्रसंगी समितीचे अध्यक्ष म्हणून आयुक्तांनी कोणतीही आपत्ती सांगून येत नसल्याने कायम सतर्क रहावे व परस्पर समन्वय राखून आपत्ती उद्भवूच नये याकरिता पूर्व नियोजन करावे अशा सूचना दिल्या.
सध्या शहरात सुरु असलेल्या स्थापत्य विकास कामांची सद्यस्थिती जाणून घेत आयुक्तांनी 15 मे पर्यंत जलद गतीने कामे पूर्ण करावीत असे निर्देशित केले व पावसाळी कालावधीत सुरु ठेवणे आवश्यक असलेल्या स्थापत्य कामांच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य प्रकारे बॅरेकेटींग लावण्यात यावेत असे सूचित केले. यामध्ये हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्यास कंत्राटदारासह संबंधित अधिका-यांवरही जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे आयुक्तांनी स्पष्ट शब्दात आदेशीत केले.
रस्ते खड्डेमुक्त असलेच पाहिजेत याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देतानाच पावसाळी कालावधीत कुठलाही रस्ता हा वीजपुरवठा खंडीत झाला यासारख्या अत्यावश्यक कारणांशिवाय खोदलाच जाऊ नये याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. त्याचप्रमाणे रस्त्याची कामे झाल्यानंतर तेथून निघणारे डेब्रीज तत्परतेने उचलण्यात यावे असेही सूचित केले. महानगरपालिकेप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभाग व एम.आय.डी.सी. प्राधिकरणाच्या अभियांत्रिकी विभागालाही या सर्व सूचना देण्यात आल्या.
मलनि:स्सारण वाहिन्यांची विहीत वेळेत सफाई पूर्ण व्हावी तसेच त्यावरील झाकणे सुव्यवस्थित असल्याची खातरजमा करून घ्यावी असे सूचित करण्याप्रमाणेच आयुक्तांनी भरतीच्या काळात पावसाळी पाण्यांच्या गटारावरील झाकणे बॅक वॉटरमुळे उघडली जाणार नाहीत याबाबत आत्ताच संभाव्य ठिकाणे शोधून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. अशाच प्रकारे होल्डींग पॉंडवरील फ्लॅपगेट दुरुस्ती आणि पंपींग स्टेशन दुरुस्तीची कामे तत्परतेने करून घ्यावीत अशाही सूचना करण्यात आल्या.
भरती – ओहोटीचे जाहीर होणारे वेळापत्रक उपलब्ध करून घेऊन त्यामधील भरतीच्या वेळांवर बारकाईने लक्ष ठेवावे व त्यादिवशी पावसाचा अंदाज असल्यास सर्व यंत्रणेने आधीपासूनच सतर्क राहून कार्यवाही करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. ज्या ठिकाणी पाणी साचू शकते अशी माहिती असलेली संभाव्य ठिकाणे लक्षात घेऊन तेथे पुरेशा प्रमाणात पंपींग सुविधा आधीपासूनच उपलब्ध करून ठेवावी असेही सूचित करण्यात आले.
दरड / घनमाती कोसळण्याची संभाव्य ठिकाणे तसेच नैसर्गिक नाल्यांची ठिकाणे आधीच हेरून ठेऊन त्याठिकाणच्या झोपड्या / घरे स्थलांतरीत करावीत तसेच नाले स्वच्छ रहावेत म्हणून प्रवाहात लावण्यात आलेल्या नेट्स पावसाळी कालावधीत काढून ठेवाव्यात अशाही सूचना देण्यात आल्या.
पावसाळी काळात सिग्नल यंत्रणा नियमित कार्यान्वित राहील याकडे लक्ष द्यावे तसेच कामे सुरु आहेत अशा ठिकाणी लावलेल्या बॅरेकेड्स जवळ रात्री अपघात घडू नयेत म्हणून लाईट ब्लिंकर / रिफ्लेक्टर लावावेत अशाही सूचना करण्यात आल्या. सर्व पथदिवे सुरु राहतील याची खबरदारी घेण्याप्रमाणेच धोकादायक विद्युत खांब प्राधान्याने बदलून घ्यावे असेही निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे महावितरण कंपनीने उघड्या केबल, डिपीची झाकणे बंद असण्याची खबरदारी घ्यावी व दुरुस्ती करून घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या.
धोकादायक इमारतींची यादी तयार करून ती विहीत वेळेत जाहीर करण्याची कार्यवाही करावी असे अतिक्रमण विभागास सूचित करण्याप्रमाणेच शहरातील बांधकाम साईटवर कॉलमसाठी खोदल्या जाणा-या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यास अपघात होण्याचा धोका लक्षात घेऊन खड्डे राहणार नाहीत याविषयी दक्षता घेण्याच्या सूचना नगररचना विभागास देण्यात आल्या.
बंदिस्त नाले व नैसर्गिक नाले यांची सफाई विहित वेळेत पूर्ण करावी असे घनकचरा व्यवस्थापन विभागास निर्देशित करीत सफाईनंतर काठाशी काढून ठेवला जाणारा गाळ थोडासा सुकल्यानंतर लगेच उचलला जावा याची खबरदारी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. पावसाळी कालावधीत वेळेत कचरा उचलण्याकडे अधिक काटेकोर लक्ष द्यावे व घनकचरा व्यवस्थापन स्थळीही कचरा विल्हेवाटीबाबत आवश्यक खबरदारी घेण्यात यावी असे आयुक्तांनी निर्देश दिले. पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे व कोणत्याही प्रकारे दूषीत होणार नाही याची काळजी घ्यावी असे सूचित करण्यात आले.
पावसाळी कालावधीतील संभाव्य आजार लक्षात घेता महानगरपालिकेकडे आवश्यक औषध साठा उपलब्ध करून ठेवणे तसेच संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आणि जनजागृती करणेबाबत आयुक्तांनी महत्वाच्या सूचना केल्या. डास उत्पत्ती स्थाने निर्माण होण्याचा धोका असलेली जोखमीची ठिकाणे लक्षात घेऊन त्याठिकाणी आरोग्य पथकांव्दारे विशेष पाहणी करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले.
महापालिका मुख्यालयात वर्षभर 24 X 7 अहोरात्र सुरु असणा-या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राप्रमाणेच पावसाळी कालावधीत बेलापूर, नेरुळ, वाशी, ऐरोली येथील अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी 25 मे पासून आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावेत तसेच आठही महापालिका विभाग कार्यालयात विभागीय नियंत्रण कक्ष सुरु करून या सर्व ठिकाणी आवश्यक साधनसामुग्री व उपकरणांसह मदत करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे असे आयुक्तांनी सूचित केले. याशिवाय अग्निशमन विभागाकडे असलेल्या रबर बोटी, पाणी उपसा पंप तसेच इतर साहित्य व उपकरणे कार्यान्वित असल्याबाबत तपासणी करून घ्यावी असेही निर्देशित करण्यात आले.
15 मे पर्यंत अडथळा आणणा-या झाडांच्या फांद्यांची आवश्यक तेवढ्याच प्रमाणात छाटणी करावी असे सूचित करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या निवा-याकरीता शाळा व समाजमंदिरांचे विभाग कार्यालयांनी पूर्वनियोजन करावे व त्यांच्याकरीता आवश्यक अन्नधान्य साठा करून ठेवावा अशा प्रकारच्या विविध छोट्या छोट्या गोष्टींवरील महत्वाच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या.
महापालिका क्षेत्रातील सर्व प्राधिकरणे, संस्था, मंडळे, पोहणा-या व्यक्ती, हॉटेल्स, रुग्णालये, विविध प्रकारचे मदतकार्य करणा-या संस्था व व्यक्ती यांचे संपर्कध्वनी एकत्रित करून त्याची दरवर्षीप्रमाणे माहिती पुस्तिका प्रसिध्द करावी व महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही त्याला प्रसिध्दी द्यावी असे आयुक्तांनी सूचित केले.
या बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार तसेच महानगरपालिकेचे सर्व विभागप्रमुख, विभागांचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, वाहतुक पोलीस, एम.एम.आर.डी.ए., सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग, एम.आय.डी.सी., एम.टी.एन.एल., ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय, सुरक्षा व आरोग्य विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, रेल्वे प्रबंधक, ए.पी.एम.सी. मार्केट, महावितरण, रॅपिड ॲक्शन फोर्स, बी.ई.एस.टी., नागरी संरक्षण दल, टी.बी.आय.ए., स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असो., केमिकल ॲण्ड अल्कली इंटस्ट्रीयल सोसा., मच्छिमार संघटना यांचे मुख्य अधिकारी, पदाधिकारी यापैकी काही सोशल डिस्टन्सींग राखत प्रत्यक्षात तसेच अनेक व्हिडीओ कॉन्फन्सींगव्दारे सहभागी झाले होते.