कोव्हीड प्रतिबंधासाठी ए.पी.एम.सी. मार्केट प्रशासनाला गर्दी नियंत्रणासाठी निर्बंध घालण्याच्या सूचना
संपूर्ण एम.एम.आर. क्षेत्रामध्ये अन्नधान्य, भाजीपाला, फळे अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे मध्यवर्ती केंद्र असणारे तुर्भे येथील ए.पी.एम.सी. मार्केट हे कोरोना वाढीचे नवी मुंबईतील सर्वात जोखमीचे क्षेत्र आहे. त्यामुळे कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना ए.पी.एम.सी. मधील पाचही मार्केटकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी तुर्भे विभागाचे नोडल अधिकारी उप आयुक्त श्री. राजेश कानडे आणि तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. सुबोध ठाणेकर यांना ए.पी.एम.सी. मार्केटमधील संख्या नियंत्रण आणि त्याठिकाणचे कोव्हीड टेस्टींग याकडे बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश दिलेले आहेत.
या अनुषंगाने या दोन्ही अधिका-यांनी ए.पी.एम.सी. सचिव श्री. संदीप देशमुख यांची पोलीस उपआयुक्त श्री. सुरेश मेंगडे व सहा. पोलीस आयुक्त श्री. वस्त यांच्यासह भेट घेऊन त्यांना एपीएमसी मार्केटमध्ये काटेकोर नियंत्रण ठेवणेबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. ए.पी.एम.सी. मार्केट हे मुंबई व आसपासच्या इतर शहरांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे घाऊक मार्केट असून ते बंद करणे शक्य नसले तरी त्याठिकाणी संख्या मर्यादेचे तसेच कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे याची कल्पना देत घाऊक विक्री सुरू ठेवून किरकोळ विक्री पूर्णपणे बंद कऱण्यात यावी असे सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे येत्या सोमवारपासून म्हणजे 26 एप्रिलपासून कोव्हीड टेस्टींग निगेटिव्ह रिपोर्ट दाखवूनच मार्केटमध्ये प्रवेश दिला जावा अशाही सूचना करण्यात आल्या.
मार्केटच्या वेळांनुसार दिवसरात्र कोव्हीड टेस्टींग सेंटर्स कार्यान्वित
नवी मुंबई महानगरपालिकेने सुरवातीपासूनच कांदा बटाटा, भाजीपाला, फळे, मसाला व दाणा बाजार अशा पाचही मार्केटमध्ये कोव्हीड टेस्टींग सेंटर कार्यान्वित केली असून त्याठिकाणी दररोज 1500 हून अधिक टेस्टींग केले जात आहे. या सर्व मार्केटच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने त्याला अनुरुप कोव्हीड टेस्टींग सेंटर कार्यान्वित करण्यात आली असून भाजीपाला मार्केटमध्ये सकाळी 8 ते 2 तसेच रात्री 10 ते 3 व रात्री 3 ते 8 अशा तीन शिफ्टमध्ये कोव्हीड टेस्टींग केले जात आहे. फळ मार्केटमध्ये सकाळी 6 ते 12 तसेच मसाला मार्केट, कांदा बटाटा मार्केट व दाणा बाजार याठिकाणी सकाळी 7 ते 2 या वेळेत कोव्हीड टेस्टींग सेंटर कार्यान्वित असतात. रविवारच्या दिवशीही कांदा बटाटा मार्केटमध्ये सकाळी 7 ते 2 या वेळेत कोव्हीड टेस्टींग करण्यात येते.
कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कारवाई
याशिवाय मार्केटमध्ये मास्क, सुरक्षित अंतर अशा कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्ती / दुकानदार यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात असून याकरिता प्रत्येक शिफ्टमध्ये 5 व्यक्तींची 5 विशेष दक्षता पथके म्हणजे 15 विशेष दक्षता पथके ए.पी.एम.सी. मार्केटमध्ये कार्यरत आहेत.
महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार आज सकाळी 6 वाजल्यापासून उप आयुक्त श्री. राजेश कानडे, सहा. आयुक्त श्री. सुबोध ठाणेकर यांनी पोलीसांसह भाजी मार्केटमध्ये धडक कारवाई केली असून 61 व्यक्तींवर कारवाई करीत रुपये 20 हजार 600 इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.
कोव्हीडचा वाढता प्रसार रोखण्यासाठी ए.पी.एम.सी.च्या पाचही मार्केटमध्ये होणारी गर्दी नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक असून तेथील गाड्यांची आवक मर्यादित ठेवण्यासाठी नियोजन करणे व तशा प्रकारचे निर्देश व्यापारी व माल पुरवठा करणारे पुरवठादार यांना देणे त्याचप्रमाणे कोव्हीड टेस्ट निगेटिव्ह प्रमाणपत्र दाखवूनच मार्केटमध्ये प्रवेश दिला जावा अशा प्रकारच्या सूचना ए.पी.एम.सी. प्रशासनाला करण्यात आल्या असून त्याची योग्य अंमलबजावणी करण्याकडे महानगरपालिका आणि पोलीस यांच्यामार्फत लक्ष ठेवले जाणार आहे.