नवी मुंबई

80 टक्के बेड्स महानगरपालिकेमार्फत सूचित कोव्हीड रूग्णांसाठी राखीव ठेवण्याचे खाजगी रूग्णालयांना बंधनकारक

कोरोना बाधीतांची वाढती दैनंदिन संख्या लक्षात घेता रूग्णालयीन सुविधांच्या वाढीवर भर दिला जात आहे. त्यादृष्टीने आधीपासूनच महापालिकेच्या वतीने आयसीयू बेड्सच्या संख्या वाढीप्रमाणेच खाजगी कोव्हीड रूग्णालयांतही आयसीयू बेड्स व व्हेटिलेटर्स मध्ये वाढ करण्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्यामार्फत निर्देशित करण्यात आले आहे. त्यास खाजगी रूग्णालयांकडून सकारात्मक प्रतिसादही लाभत आहे.

याशिवाय ज्यांना खरोखरच आयसीयू बेड्स व व्हेटिलेटर्सची आवश्यकता आहे अशा रूग्णांनाच त्या सुविधा मिळाव्यात याकरिता महानगरपालिकेने रूग्णालयनिहाय नेमलेल्या नोडल अधिकारी यांच्यामार्फत बारकाईने लक्ष देण्यात येत आहे.

साधारणत: मागील आठवडाभरापासून आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्स मिळण्यामध्ये गंभीर लक्षणांच्या रूग्णांना अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आज दि. 14 एप्रिल 2021 रोजी आदेश निर्गमित केला असून त्याव्दारे खाजगी कोव्हीड रूग्णालयांतील 80 टक्के बेड्सचे नियंत्रण नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत केले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत बेड्स उपलब्धेकरीता नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये यादृष्टीने 022-27567460 ही हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली असून या मदत कक्षाव्दारे कोव्हीड बाधितांना त्यांच्या लक्षणांच्या तीव्रतेनुसार बेड्स उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सदर हेल्पलाईनव्दारे सूचित करण्यात आलेल्या रूग्णांना या 80 टक्के नियंत्रित बेड्सवर दाखल करून घेण्यास प्राधान्य देण्यात यावे असे रूग्णालय व्यवस्थापनांना निर्देशित करण्यात आले आहे. यावर संबंधित रूग्णालयासाठी नियुक्त महानगरपालिकेचे नोडल अधिकारी यांचे नियंत्रण असणार आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना रूग्णालयांनी आपल्या दर्शनी भागात महानगरपालिकेमार्फत नियंत्रित 80 टक्के बेड्स व रूग्णालय व्यवस्थापनामार्फत नियंत्रित 20 टक्के बेड्सची माहिती नागरिकांना सहज दिसेल अशा स्वरूपात फलकावर ठळकपणे प्रदर्शित करावयाची आहे. त्यामध्ये रूग्ण दाखल असलेले बेड्स व रूग्णांसाठी उपलब्ध असलेले बेड्स (आयसीयू व ऑक्सिजन सुविधा असलेले अशी स्वतंत्र नोंद) यांची माहिती प्रदर्शित करणे महत्वाचे आहे.

यामध्ये आणखी एक विशेष आणि महत्वाची बाब म्हणजे कोणतीही लक्षणे नसलेला कोव्हीड पॉझिटिव्ह रूग्ण कोमॉ़र्बिडीटी नसूनही आयसीयू आणि डीसीएचसी बेड्स वर दाखल असेल तर अशा रूग्णांना आयसीयू बेड्सवरून हलवून त्यांच्या लक्षणांच्या अनुरूप वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देऊन त्याठिकाणी आवश्यकता असलेल्या गंभीर लक्षणाच्या रूग्णांना आयसीयू बेड्स उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

याशिवाय महाराष्ट्र शासन अधिसूचनेनुसार रूग्णालयीन सेवा दर आकारण्यात यावेत असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

एकीकड़े आयसीयू व व्हेंन्टीलेटर्स बेड्सच्या वाढीकडे लक्ष देतानाच कोव्हीड रूग्णांना त्यांच्या लक्षणांच्या तीव्रतेनुसार रूग्णालयीन आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकडेही आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचेमार्फत लक्ष दिले जात असून खाजगी रूग्णालयांसाठीचा हा आदेशही त्याचाच एक भाग आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button