वेध शिक्षणाचा
गेल्या तीन चार दिवसांपासून साक्षी भलतीच खुश होती. त्याला दोन कारणे होती. एक म्हणजे आज तीचा शाळेतील इयत्ता तिसरीच्या वार्षिक परीक्षेचा निकाल होता आणि दुसरे म्हणजे तीची मुंबईला राहणारी लाडकी मैत्रीण आज गावी येणार होती. त्यामुळे ती सकाळीच लवकर उठुन आंघोळी-पांघोळी करुन तयार झाली होती. इतक्यात तीचे बाबा गुरांना चरायला नदीकडे सोडून आता अंगणापर्यंत आले होते. “झांल का गं साक्षी? शाळेत जायाला उशीर होतोय, चल लवकर..!” खांद्यावरचा फाट्यांचा भारा एका हाताने खाली उतरवीत बाबांनी आवाज दिला. “हो हो बाबा, चला चला” असे बोलून पायात चप्पला सरकावत साक्षी बाबांसोबत शाळेमध्ये जायला निघाली. तसा साक्षीचा लाडका मोत्या शेपूट हालवत हालवत तोही सज्ज झाला. त्या दोघांच्या पायात लुडबुड करत त्या तिघांची स्वारी आता शाळेच्या दिशेने निघाली.
हरहुन्नरी, हुशार प्रत्येक गोष्टीची जाण व जिज्ञासा असलेली एक नाजुक आणि चुणचुणीत अशी मुलगी म्हणजे साक्षी. शिक्षकांची सर्वांत लाडकी, तीचे सामान्य ज्ञान वाढावे म्हणून गुरुजी तिला अनेक पुस्तके स्वखर्चांने आणून देत. चाळीशीतले तीचे वडील. घरची आर्थिक परिस्थिती खूपच नाजुक, शिक्षण दहावी नापास. पुढे दोन -तीन वर्षांत मुंबईला बऱ्याच नोकऱ्या केल्या तश्या सोडूनही दिल्या. शेवटी सर्वांत सोपे, फारशी शिक्षणाची गरज नाही. फारसं डोकही लावण्याची गरज नाही म्हणून ड्रायव्हरची नोकरी स्विकारली. पण दुर्देवाने एका अपघातात त्यांचा एक हात निकामी झाला. त्यामुळे आता कोणतीही नोकरी मिळणे त्यांना सहज शक्य नव्हते. मग शेवटी गावची वाट धरली. आई मोलमजूरी करुन कसातरी आपला घरगाडा ढकलीत होती. आई-बाबांचे छोट्या मोठ्या कारणांवरुन नेहमीच खटके उडत असत. आईला नेहमीच बाकीच्या बायकांप्रमाणे मुंबई-पुण्याला राहावेसे असे वाटत होते. पण करणार काय? बाबांचाही नाईलाज होता. वडीलांवर साक्षीचा खूप जीव होता. आईने केलेला वडीलांचा अपमान साक्षीला सहन होत नसे. अशी काही भांडणे घरात सुरु झाली की ती पाठीमागच्या अळवंडीला जावून गुपचूप रडत असे. साक्षीला एक छोटा भाऊ होता. नाव सुरज, तो बालवाडी मध्ये शिकत होता. दररोज त्याला शाळेत घेवून जाणे-आणणे हे साक्षीचे काम.
मे महीन्यात आता सुर्य आगच ओतत होता. गावात इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतची शाळा. गाव साधारण छोटे होते. शंबर-सव्वाशे उंभरठा, पण शाळेतील एकून पटसंख्या फक्त सहा आणि आता चौथी मधील दोन विद्यार्थी पास झाले म्हणजे या वर्षीची एकूण पटसंख्या चार होणार होती. दोन शिक्षक, एक बालवाडी शिक्षिका असा एकूणच शाळेचा ताफा.
साक्षीचा निकाल जाहीर होताच सर्व मुलांनी, पालकांनी टाळ्यांच्या गडगडात साक्षीचे स्वागत केले. कारण साक्षीला सर्वांत जास्त म्हणजे ८८ टक्के गुण मिळून ती वर्गात प्रथम आलेली मुलगी होती. गुरुजींनी सर्व मुलांचे व पालकांचे स्वागत केले. साक्षी आपल्या बाबांबरोबर निकालपत्र घेऊन घरी जायाला निघाली. पण आता घरी निघताना साक्षीचं काहीतरी बिनसलेले तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. तिला इतके टक्के मिळूनही ती खूश दिसत नव्हती. काहीतरी विचारात गर्क अशीच दिसत होती. घरी पोहचल्यावर तिची मुंबईवरुन आलेली मैत्रीण तन्वी तिच्या स्वागतासाठी अंगणात वाट पाहत उभी होती. पण साक्षी तीच्याशीही फारशी काही बोलली नाही. आजुबाजूची तिच्या वयाची मुले-मुली जमा झाली होती. पण.. पण.. साक्षीच काहीतरी नक्कीच बिनसले आहे हे बाबांनी पक्कच हेरलं होतं. आईने जेवण तयार ठेवले होती. साक्षी एकटीच अंगणामध्ये काहीतरी विचार करत बसली होती. इतक्यात आईने आवाज दिला. “अगं साक्षी, ये की जेवायला जेवण गार होईल”. साक्षी जेवायला तर बसली, पण तिचे लक्ष जेवणावर ही नव्हते. कशी तरी आर्धी भाकरी खाऊन हात धुवुन ती बाहेर ओटीवरील मोडक्या खाटेवर दोन्ही हाताच्या घडीrत डोके खुपसून पहूडली.
“शासनाकडून परीपत्रक आले आहे. शाळेची पट संख्या कमी असल्या कारणास्त आपली ही शाळा बंद करावी लागणार आहे आणि या मुलांना शेजारील गांवामध्ये शिक्षणांसाठी पाठवावे लागणार आहे.” हा संवाद गुरुजी आणि गावचे सरपंच यांच्या मधे सुरु असलेला साक्षीच्या ओझरता कानावर आला होता. साक्षीला आता दुसऱ्या गावात शाळेला जावे लागणार. म्हणजे पहिला प्रश्न आई बाबा इतक्या लांब शाळेसाठी पाठवतील का ? छोटा भाऊ सुरज तो आतासा कुठे बालवाडीला शाळेला जायाला लागला होता. त्याला रोज इतक्या लांब शाळेला कोण सोडणार? शेजारच्या गावामध्ये शाळेला जायचे तर मध्ये नदी पार करावी लागणार होती. पावसाळ्यात नदी पार करण्याची सोय नव्हती. पुलावरुन जायचे म्हणजे किमान चार-पाच किलोमीटरचा वळसा वाढणार होता. वीज पावसाची मी कशी शाळेत जाणार ? यांसारखे अनेक प्रश्न तिच्या मनात थैमान करुन नाचत होते. तिला खूप शाळा शिकायची आहे. मोठे होऊन शिक्षीका व्हायचे आहे. आणी झाले… काही दिवसात खरोखरच शाळा बंद होणार हे गुरुजींनी घोषीत केले. पण इतक्या लांब शाळेत पाठविण्यास साक्षीचे आई बाबा तयार होत नव्हते. शेवटी साक्षीच्या हट्टापोटी तीचा प्रवेश शेजारच्या गावातील शाळेत झाला. शाळा पाच-सहा किलोमीटर अंतरावर होती. तिच्या सोबत शिकणारी त्याच गावातील पाच-सहा मुलं-मुली होती. मनामध्ये खूप दडपण येत होतं पण करणार काय ? नाईलाज होता. शाळा सुरु होऊन आता महिना झाला होता. तरीही साक्षीचे मन काही केल्या तिथे रमत नव्हते. पावसाळा नुकताच सुरु झाला होता. अशीच एक दिवस नेहमीप्रमाणे शाळा सुटली. सर्व मुले मुली शाळेतून बाहेर पडले. पण बाहेरील वातावरण बघून अंगावर चर्र्र्रर्रकन काटा उभा राहीला. आकाशात ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. बाहेर काळाभिन्न काळोख पडलेला होता. काही क्षणातच पाऊस येणार होता. अंग थरथरत होते पण तसच धाडस करत लगबगीने तिने घरची वाट धरली. थोडे पुढे अर्धा किलोमीटर वर पोहचेपर्यंत पावसाने गाठलेच. वाऱ्याने थैमान घातले होते. पाठीवरील दप्तर एका हाताने सावरत व दुसऱ्या हातामध्ये छत्री पकडून जीव मुठीत धरुन, चिखल तुडवीत ते वेगाने चालत होते. मधेच वीजा चमकत होत्या आणि कानठळ्या बसवणारा आवाज सुन्न करत होता. त्या निसरड्या वाटेवरुन अंधाऱ्या सायंकाळी कोणीही दिसत नव्हते. अर्धा किलोमीटरचा डांबरी रस्ता संपून जिथे पायवाट सुरु होते तिथून पाय घसरुन पडायला होत होते.. पण स्वता:ला सावरत पळणे चालूच होते. मजल दरमजल करत व मनांमध्ये देवाचा धावा करत करत ती चार-पाच चिमूरडी एका पाठोपाठ एक नदीपर्यंत पोहचलीत. आज जणू देव त्यांची परीक्षाच घेणार होता. आता नदीलां थोडेशे पाणी आहे म्हणून त्यांनी धाडस करुन एकमेकांचा हात धरुन ते सारे पाण्यात शिरले. पाण्याला खूप ओढ असल्यामुळे चपला एका हाता मध्ये धरुन कशीबशी आर्धी नदी पार करण्याचा अतोनात प्रयत्न करत होते. दगडाच्या गोट्यावरुन चालताना काय कष्ट पडतात हे त्यांना आज चांगलेच जाणवत होते. इतक्यात पाण्याची एक लाट आली आणी साक्षीचा पाय घसरलाच. आपण आता वाहून जाणार या भितीने “वाचवा ….वाचवा….” जोर जोरात किंकाळ्या फोडू लागली. इतक्यात बाबां जेवणावरुन झटकण उठून ओटीवर धावत आले व साक्षीला जागे केले. “काय झाले बेटा, तू का ओरडतेस ? ” बाबा विचारत होते. साक्षीला जाग आली तर आपण घरीचा आहोत याच भान आल. पण पडलेले भयानक स्वप्न मनोमनी आठवून बाबांच्या गळ्यात पडून साक्षी आता ढसा ढसा रडत होती…
लेखन – रवि विठ्ठल कदम
ravikadamvashi@gmail.com
9892159902