नवी मुंबईतील ऑक्सिजन स्थितीचा आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांनी घेतला सविस्तर आढावा
सध्या कोरोना बाधितांची झपाट्याने वाढत असलेली संख्या पाहता व राज्यातील ऑक्सिजन कमतरतेच्या स्थितीची माहिती घेतली असता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये याकरिता सतर्कता राखत आज महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी महानगरपालिका क्षेत्रातील ऑक्सिजन स्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, रूग्णालयीन ऑक्सिजन व्यवस्थापन नोडल अधिकारी उपायुक्त श्री. मनोज महाले तसेच महानगरपालिकेची ऑक्सिजन बेड्स सुविधा असणा-या तिन्ही डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर्सचे नोडल अधिकारी व ऑक्सिजन पुरवठादार उपस्थित होते.
यावेळी आयुक्तांनी महानगरपालिकेच्या डेडिकेटेड कोव्हीड सेंटर्समध्ये ऑक्सिजन बेड्सवर उपचार घेत असलेली सध्याची रूग्णसंख्या जाणून घेत त्यांना दैनंदिन किती ऑक्सिजन पुरवठा लागतो याची तपशीलवार माहिती घेतली व भविष्यात संभाव्य किती ऑक्सिजन पुरवठा लागेल याची पडताळणी करीत तशा प्रकारे सिलेंडर वाढीचे निर्देश संबंधितांना दिले. सद्यस्थितीत महानगरपालिकेकडे पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध असून इमर्जन्सीकरिता 20 दिवसांचा ऑक्सिजन साठा उपलब्ध करून ठेवण्यात आलेला आहे.
ऑक्सिजन पुरवठ्याची दैनंदिन नोंद ठेवून त्याचे नियमित निरीक्षण करीत त्याचे विहित वेळेत रिफिलींग करणे ही बाब अतिशय महत्वाची असून त्याकडे काटेकोर लक्ष ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधितांना दिले. त्याचप्रमाणे सद्यस्थितीतील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता ऑक्सिजन सिलेंडरमध्ये वाढ करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. सिलेंडर वाढीसोबतच लिक्विड टँक उभारण्याची कार्यवाही देखील जलद करावी असे आयुक्तांनी निर्देशित केले.
त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या खाजगी रूग्णालयांमधील ऑक्सिजन आवश्यक असलेल्या बेड्ससाठी ऑक्सिजन पुरवठादार कंपन्या सुनिश्चित करणे व या कंपन्यांची यादी खाजगी रूग्णालयांना उपलब्ध करून देण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले.
रूग्णालयीन सुविधांमध्ये वाढ करताना ऑक्सिजन सारख्या अत्यंत गरजेच्या व महत्वाच्या गोष्टीकडेही बारकाईने लक्ष ठेवले जात असून सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये असलेली ऑक्सिजन बेड्सची क्षमता पूर्णपणे वापरात येण्याच्या दृष्टीने आगामी काळातील गरज लक्षात घेऊन नियोजन केले जात आहे.