महाराष्ट्र

‘वहाबी अतिरेकी दहशतवादी संघटनां’ वर राष्ट्रहितासाठी बंदी घाला

Sunil Tawade

जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून दहशतवाद्यांकडून राजौरी, कुपवाडा, डोडा यांसारख्या भागांना लक्ष्य केले जात आहे. या भागात दहशतवादी सतत लष्कराच्या वाहनांवर अथवा चौक्यांवर हल्ले करत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत या हल्ल्यांमध्ये अनेक भारतीय जवानांना हौतात्म्य मिळाले असून सामान्य नागरिकांनीही आपले प्राण गामावले आहेत. या हल्ल्यांची जबाबदारी पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनांनी घेतली आहे. याचं पार्श्वभूमीवर इंडियन मुस्लीम असोसिएशन- नुरी (IMAN) यांनी पत्र लिहित या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

‘इंडियन मुस्लीम असोसिएशन- नुरी’चे राष्ट्रीय सचिव मुहम्मद एबाद शेख यांनी पत्र लिहित जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारणारे गट हे वहाबी पंथ मानणारे असल्याची बाब लक्षात आणून दिली आहे. त्यांनी आपल्या पत्रात्त म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे, राजौरी, कुपवाडा, डोडा यांसारख्या भागात दहशतवादी सतत लष्करावर हल्ले करत आहेत. प्रदीर्घ काळाच्या शांततेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेले हे हल्ले पाकिस्तानशी जोडले जात आहेत. जैश-ए-मोहम्मदशी संबंधित काश्मीर टायगर्सने या भागात घडलेल्या अनेक घटनांची जबाबदारी स्वीकारली आहे. यातून स्पष्टपणे लक्षात येतं की, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ज्यांना भारतात अशांतता पसरवायची आहे, अशा संघटनांचा हात यामागे आहे. दुसरीकडे, भारतीय लष्कराचे जवान या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देऊन हे हल्ले हाणून पाडत आहेत, असं ते म्हणाले आहेत.

त्यांनी पुढे हे निदर्शनात आणून दिले आहे की, जगभरात इस्लामच्या नावावर दहशतवाद घडवणाऱ्या या सर्व दहशतवादी संघटना वहाबी पंथाचे पालन करणाऱ्या ‘वहाबी अतिरेकी दहशतवादी संघटना’ आहेत. याच पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये घडणाऱ्या या दहशतवादी घटना लक्षात घेऊन भारत सरकारने सांप्रदायिक सहानुभूती असलेल्या वहाबी अतिरेकी दहशतवादी संघटनांवर तात्काळ बंदी घालावी आणि भारतभर सुरक्षा व्यवस्था कडक करावी, अशी मागणी ‘इंडियन मुस्लीम असोसिएशन- नुरी’ ने केली आहे.

भारत सरकारने केवळ जम्मू-काश्मीरमध्ये ‘जमात-ए-इस्लामी’वर बंदी घातली आहे मात्र हे योग्य पाऊल नसून सुरक्षेच्या कारणास्तव, स्लीपर सेल आणि केवळ जमात-ए-इस्लामीच्याच नव्हे तर इतर सक्रिय संघटना, भारतात कार्यरत असलेल्या वहाबी अतिरेकी संघटनांवर संपूर्ण बंदी घालण्यात यावी आणि निर्बंधही लागू केले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘इंडियन मुस्लीम असोसिएशन- नुरी’ने जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या सर्व भ्याड दहशतवादी हल्ल्यांचा जाहीर निषेध व्यक्त करत हुतात्मा भारतीय जवान, ठार झालेले नागरिक यांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रहितासाठी वहाबीवर आधारित अतिरेकी विचारसरणी असलेल्या गटांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button