नवी मुंबई

50 हजारहून अधिक विद्यार्थी, युवकांनी एकमुखाने नवी मुंबईत केला स्वच्छतेचा जागर

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

“इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत सीबीडी, बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात “नवी मुंबई इको क्नाईट्स” संघाचे कर्णधार पद्मश्री श्री. शंकर महादेवन यांच्यासमवेत 41 हजारहून अधिक विद्यार्थी, युवकांनी विशेष कार्यक्रमात सहभागी होत स्वच्छतेचा एकमुखाने जागर केला. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथील सभागृहात लावलेल्या बीग एलईडी स्क्रीनवरुन ऑनलाईन अनुभवणा-या 12 हजार विद्यार्थी व युवकांनीही या स्वच्छता जागरात सहभाग घेतला.

केंद्र सरकारच्या नगरविकास विभागामार्फत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत जाहीर करण्यात आलेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग’ मध्ये “युथ वर्सेस गार्बेज” या टॅगलाईन नुसार भव्यतम कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले होते. यामध्ये 53 हजारहून अधिक युवकांनी स्वच्छ नवी मुंबईचा जागर केला.

याप्रसंगी नवी मुंबई इको क्नाईट्स संघाचे कर्णधार पद्मश्री श्री. शंकर महादेवन यांच्यासमवेत विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक व आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, विधानपरिषद सदस्य श्री. रमेश पाटील, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या सह सुप्रसिध्द अभिनेते श्री. मकरंद अनासपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

“निश्चय केला – नंबर पहिला” हे आपले ध्येय असून त्यासाठी नवी मुंबईतील युवकांची शक्ती आज एकत्र आलेली आहे याचा आनंद व्यक्त करीत श्री. शंकर महादेवन यांच्या हस्ते नवीन स्वच्छता जिंगलचे अनावरण करण्यात आले. उपस्थित युवकांसमवेत ही स्वच्छता जिंगल व आणखी काही लोकप्रिय गीते गाऊन श्री. शंकर महादेवन यांनी उपस्थित तरूणाईमध्ये चैतन्य निर्माण केले.

सुप्रसिध्द अभिनेते श्री. मकरंद अनासपुरे यांनी स्वच्छतेमध्ये नेहमीच आघाडीवर असणा-या नवी मुंबईतील तरूणाई समोर आज स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यासाठी यायला मिळते आहे याचा आनंद व्यक्त करीत युवा शक्तीमुळे स्वच्छता कार्याला अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

  • नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे स्वच्छतेमध्ये आपण नेहमीच आघाडीवर असतो व यापुढील काळातही राहू अशी खात्री आमदार श्री. गणेश नाईक यांनी व्यक्त केली.
  • आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी स्वच्छतेबाबत जागरूकतेने उपस्थित असलेल्या विद्यार्थी, युवकांना शुभेच्छा देत नवी मुंबईचा नावलौकीक असाच उंचावत ठेवण्याचे आवाहन केले.
  • आमदार श्री. रमेश पाटील यांनी आपल्या नवी मुंबई शहराने विविध सेवासुविधांमध्ये पुढाकार घेतला असून स्वच्छतेतही आपला पहिला नंबर असाच कायम राहील असे आजच्या उपस्थितीमधून दिसून येत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी सादर झालेल्या आफरिन बँडच्या सुरेल सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फुर्त दाद दिली. विशेषत्वाने डिमॉलेशन क्रु या सुप्रसिध्द नृत्य समुहाचे चित्त थरारक नृत्याविष्कार पाहताना समोरील युवक भारावून गेले. स्टँडअप कॉ़मेडियन श्री. मंदार भिडे यांनी आपल्या लहानपणीचे व शालेय महाविद्यालयीन जीवनातील किस्से सांगत मनोरंजनातून प्रबोधन केले.

41 हजाराहून अधिक विद्यार्थी व युवक अत्यंत शिस्तबद्धरित्या राजीव गांधी क्रीडा संकुलात उपस्थित होते. पर्जन्यवृष्टी होऊनही कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ न देता विद्यार्थी, युवकांनी उत्साही सहभाग घेत स्वच्छतेचा जागर केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button