उद्याच्या उज्वल भारतासाठी मुलांमध्ये जिज्ञासूवृत्ती आणि विज्ञानदृष्टी जागृत करण्याची गरज – ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
विज्ञाननिष्ठ भारताच्या निर्मितीसाठी देशाचे उज्वल भविष्य असणा-या लहान मुलांमध्ये विज्ञानदृष्टी जागृत करण्याची गरज असून त्यादृष्टीने आधुनिक काळाची पावले ओळखत बहुआयामी शिक्षण देण्याची आवश्यकता ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘विज्ञानाधिष्ठित समाजाकडे’ या विषयावर डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी संपूर्ण भरलेल्या प्रेक्षागृहातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी व नागरिकांशी सहज संवाद साधत अत्यंत सोप्या भाषेत विज्ञान, तंत्रज्ञान विषयक माहितीचा खजिना खुला केला तसेच अनेक उदाहरणे देत आगामी काळातील आव्हानांविषयी भाष्य केले.
आपल्याला ज्ञानेश्वरांकडून विज्ञानेश्वरांकडे जायचे आहे असे सांगत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मुलांना भरपूर शिकू द्या, त्यांच्या शिक्षणातच त्यांचे भविष्य आहे असे पालकांना आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या जीवनात योग्य दिशा देणा-या शिक्षकांचे महत्व आपल्या भावेसरांच्या आठवणी सांगत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी उलगडताना मुलांमध्ये जिज्ञासा वाढीसाठी त्यांना प्रश्न विचारण्याची सवय लावण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. शिक्षकांना प्रतिष्ठा देणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे विषद करीत त्यांनी आजचा विद्यार्थी हा मोबाईलमुळे सा-या जगाच्या माहितीशी जोडला गेलाय त्यामुळे शिक्षकांनीही माहितीच्या दृष्टीने अद्ययावत राहण्याची, नवा विद्यार्थी येतोय त्याच्यासाठी नवे होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राईट टू एज्युकेशनच्या पुढे जाऊन डिजीटल राईट टू एज्युकेशनची गरज व्यक्त करताना डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आजच्या झपाट्याने बदलत्या युगात नवनवीन लागणा-या शोधांमुळे भविष्याचा वेध घेऊन शिक्षण पध्दतीत करायच्या बदलांचा विचार केला पाहिजे व त्यादृष्टीने शाळांमध्ये प्रयोग केले जावेत असे मत मांडले. आपण जे शिकवतो ते मुलांच्या भविष्याचा विचार करून शिकवायला हवे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
अनेक छोट्या छोट्या गोष्टी सांगत तसेच मुलांना प्रश्न विचारून त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी अर्धा भरलेला ग्लास रिकामा किती प्रकारे करता येईल असा प्रश्न विचारून त्याचे मुलांना सूचतील असे पर्याय ई मेल व्दारे कळविण्यास सांगितले. त्यातील सर्वोत्तम उत्तरांना 3 रोख रक्कमेची पारितोषिके दिली जातील असे जाहीर करीत त्यांनी मुलांच्या कल्पकतेला मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
कोरोना काळात मुलांना ऑनलाईन शिक्षणामुळे वेगळ्या स्वरूपाच्या शिक्षण पध्दतीचा अनुभव घेता आला असे सकारात्मक मत मांडत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आपल्या 79 वर्षांच्या जीवनातील अनुभवांच्या परिपाकातून आलेले 5 माशेलकर मंत्र यावेळी सांगितले. महत्वाकांक्षा उंच ठेवा, प्रज्ञेला परिश्रमाची जोड द्या, समस्येचा भाग न होता उत्तराचा भाग होण्याचा कसोशीने प्रयत्न करा, आत्मविश्वास व चिकाटीने काम करीत रहा आणि उत्तमतेच्या यशाच्या पाय-यांना शेवट नसतो या 5 अनुभवसिध्द मंत्राचे महत्व त्यांनी विविध प्रसंग, आठवणी सांगत सहजपणे उलगडले.
यावेळी विद्यार्थ्यांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांनाही त्यांनी समर्पक उत्तरे विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत दिली. यावेळी त्यांनी आदर्श असणा-या आईच्या, एपीजे अब्दुल कलाम यांच्या, हल्दीघाटची लढाईच्या अनेक आठवणी सांगितल्या.
आपल्या भारत देशाचे भविष्य उज्वल आहे आणि ते तुमच्या हातात आहे असे विद्यार्थ्यांना आवाहन करीत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सर्व विद्यार्थ्यांकडून ‘माय इंडिया’ हे घोषवाक्य एका सूरात म्हणवून घेताना प्रेक्षागृह ऊर्जेने भारले गेल्याचा प्रत्यय सर्वांना आला.
याप्रसंगी प्रास्ताविकर मनोगत व्यक्त करताना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी लहानपणी शाळेत असताना डॉ. जयंत नारळीकर यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर भारले गेल्याची आठवण सांगितली. लहान वयात डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या महनीय व्यक्तीला प्रत्यक्ष बघण्याचा, ऐकण्याचा भाग्ययोग लाभणे ही अनेक जणांसाठी प्रेरणा देणारी गोष्ट ठरेल या उद्देशाने हा विशेष सुसंवाद आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भविष्याच्या प्रगतीसाठी मौलिक असे विचार ऐकण्याचा सुयोग लाभला यामुळे अमृत महोत्सव आयोजनाचे सार्थक झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
विष्णुदास भावे नाट्यगृह लहान-मोठ्या विद्यार्थ्यांनी पूर्णपणे भरलेले असूनही अत्यंत शांतपणे हा सुसंवाद अनुभवणा-या जिज्ञासू नवी मुंबईकर मुलांचे कौतुकही डॉ, रघुनाथ माशेलकर यांनी केली.
नवी मुंबई हे नवे शहर असून त्याच्या नाविन्य पूर्णतेतील गुणवत्तेचा प्रत्यय विविध कामांतून येतो असे मत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी विष्णुदास भावे नाट्यगृहात प्रदर्शित केलेल्या महानगरपालिकेच्या सध्या कार्यान्वित व नियोजित प्रकल्पांविषयीचे माहितीफलक व मॉडेल्स अवलोकन केल्यानंतर व्यक्त केले.