‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत 9 ते 17 ऑगस्टमध्ये प्रत्येकाने घरावर राष्ट्रध्वज फडकविण्याचे आयुक्तांचे आवाहन
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था याठिकाणी राष्ट्रध्वज फडकाविण्याचे सूचित करण्यात आले आहे. याबाबत महापालिका स्तरावरून ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या नियंत्रणाखाली अंमलबजावणी समितीची नेमणूक करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त घरांवर तसेच महापालिका क्षेत्रातील कार्यालये व आस्थापना यावर स्वयंस्फुर्तीने तिरंगा फडकविणे या उपक्रमांतर्गत अपेक्षित आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेले असून यामध्ये नागरिकांचा उत्फुर्त सहभाग अपेक्षित आहे. या अनुषंगाने ध्वजांची उपलब्धता करुन घेण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करीत असताना जनतेच्या मनात भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती चिरंतन तेवत रहाव्यात तसेच देशभक्तीची जाज्वल्य भावना मनात कायम रहावी या भावनेने आपल्या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्याच्या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविला जात आहे.
या उपक्रमाच्या अनुषंगाने प्रत्येक नागरिकाने आपला तिरंगा ध्वज स्वत: खरेदी करुन तो स्वयंस्फुर्तीने आपल्या घरावर, कार्यालयामध्ये फडकविणे अपेक्षित आहे. याशिवाय ज्या नागरिकांना राष्ट्रध्वज खरेदी करणे शक्य नाही अशा नागरिकांकरिता विविध संस्था, व्यक्ती, उदयोगसमुह यांच्या माध्यमातून राष्ट्रध्वज उपलब्ध करुन घेणे प्रस्तावित आहे. यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संस्था, व्यक्ती. उद्योगसमुह यांना आवाहन करण्यात येत आहे.
भारतीय ध्वजसहिता 2002 मधील नियम 1.2 नुसार भारतातील नागरिकांना राष्ट्रीय सणानिमित्त त्यांच्या घरांवर, कार्यालये, कारखाने, शालेय इमारती अशा विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. मात्र ध्वज फडकविताना व त्यानंतरही भारतीय ध्वजसंहितेतील नियमांचे पालन करणे गरजेचे असून याबाबतही महानगरपालिका स्तरावरुन नागरिकांच्या माहितीसाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी असेही निर्देश आयुक्तांनी दिलेले आहेत.
ध्वजसंहितेनुसार खादीसह पॉलिस्टर, वूल, स्पन, लोकर यापासून राष्ट्रध्वज बनविला जाऊ शकतो. ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत नागरिक स्वत: हे ध्वज खरेदी करु शकतात तसेच एकमेकांना भेटही देऊ शकतात. त्याचप्रमाणे विविध उदयोग, संस्था या त्यांच्या सीएसआर निधीतूनही ध्वज उपलब्ध करुन देऊ शकतात. भारतीय राष्ट्रध्वजाविषयी आपला आदर व प्रेम प्रकट करण्यासाठी नागरिक राष्ट्रध्वजासोबत सेल्फी काढून पोस्ट करू शकतात, तसेच समाज माध्यमांवरून राष्ट्रध्वज एकमेकांना भेट देऊ शकतात त्याचप्रमाणे मेटल ध्वज परिधान करून आपले देशप्रेम व्यक्त करू शकतात.
‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या, क्रांतीकारकांविषयीच्या आपल्या आदराच्या भावना तसेच देशाविषयीच्या अभिमानाचे दर्शन घडविण्यासाठी प्रत्येक घरात, सोसायटीत, विभागात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाऊ शकते. तसेच व्यक्तिगत आणि संस्थात्मक पातळीवरूनही विविध कार्यक्रम राबविले जाऊ शकतात. याकरिता नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेऊन ‘हर घर तिरंगा उपक्रम’ यशस्वी करणे अभिप्रेत आहे.
आपल्या देशाबद्दल प्रत्येकाच्या मनात असलेला आदर व सन्मान अभिव्यक्त करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ हा अतिशय अभिनव उपक्रम ही एक चांगली संधी असून यामध्ये प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने सक्रीय सहभागी होऊन आपल्या मनात असलेली देशभक्ती मूर्त स्वरुपात प्रकट करण्याच्या दृष्टीने आपल्या घरावर व कार्यालयामध्ये 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत तिरंगा फडकवावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.