रस्ते दुरुस्ती कामांची ठिकठिकाणी जाऊन आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रस्ते दुरुस्तीच्या कामांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
या सुरु असलेल्या रस्ते दुरुस्ती कामांची प्रत्यक्ष स्थळांना भेट देत आयुक्तांनी ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली व एका रस्त्याचे काम करण्यास सुरुवात केल्यावर त्या रस्त्यांची संपूर्ण दुरुस्ती करावी व त्यानंतरच पुढील रस्त्याच्या कामास सुरूवात करावी असे स्पष्ट निर्देश दिले. याकरिता पथके वाढवून दिवस व रात्र अशा दोन पाळ्यांमध्ये कामे करावीत असेही त्यांनी निर्देशित केले. रस्त्यांची कामे सुरु असताना वाहतूक पूर्णपणे बंद न करता जेवढया भागाचे काम सुरु आहे तेवढयाच भागातील वाहतूक बंद ठेवून ती रस्त्याच्या उरलेल्या भागातून वळवावी असेही आयुक्तांनी सूचीत केले.
ठाणे बेलापूर मार्गाची पाहणी करताना विशेषत्वाने उड्डाणपुलाचा पृष्ठभाग उखडला गेल्याचे व त्याठिकाणी रस्ते दुरूस्तीची कामे सुरु असल्याचे पाहणीमध्ये निर्देशनास आले. या मार्गावर वाहतुकीचा सर्वाधिक ताण असल्याने येथील रस्ता दुरुस्तीची कार्यवाही अधिक काळजी घेत गुणवत्ता राखून करावी असे निर्देशित करतानाच आयुक्तांनी ही दुरुस्तीची कामे जलद पूर्ण करताना ती पावसाळी कालावधीत टिकतील व पुन्हा लगेच करावी लागणार नाहीत याची काटेकोर काळजी घेऊन व्यवस्थितरित्या करावीत असे स्पष्ट निर्देश दिले. याठिकाणी पथके वाढवून कामाला गती द्यावी असेही त्यांनी निर्देशित केले.
शहरात विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी करताना रहदारीची वर्दळ असणा-या रस्त्यावर रात्री वाहतुक कमी असते अशा वेळेत रस्ता दुरुस्ती कामे करावीत असे निर्देश आयुक्तांनी दिले. बेलापूर सेक्टर 15 पासून सुरूवात करून सेक्टर 11, आम्र मार्ग, नेरूळ विभागात सेक्टर 25,27,46,48,42,40,38, ज्वेल ऑफ नवी मुंबई जवळील जंक्शन, सेक्टर 28,10,8,16,18, नेरूळ गांव, सारसोळे गाव, नेरूळ स्टेशन, सेक्टर 6 व 4 तसेच जुईनगर सेक्टर 23,24,25,11,8, सानपाडा रेल्वे स्टेशन परिसर, सेक्टर 30, एपीएमसी भाग, तुर्भे गाव, वाशी सेक्टर 14,15,28,29, वाय जंक्शन, ठाणे बेलापूर मार्ग, टी जंक्शन ऐरोली, आंबेडकरनगर, संभाजीनगर, निब्बाण टेकडी त्याचप्रमाणे रबाळेपासून नेरूळ पर्यंत एमआयडीसी क्षेत्र अशा विविध भागांची आयुक्तांनी शहर अभियंता श्री. संजय देसाई यांचे समवेत पाहणी केली. यामध्ये रस्ते दुरूस्ती सुरू असलेल्या ठिकाणी कामांची पाहणी करीत मौलिक सूचना केल्या.
पावसाळी कालावधीत रस्ते दुरुस्तीकरिता कोल्डमिक्स या अत्याधुनिक साहित्याचा वापर करण्यात येत असून प्रत्येक विभागाकरिता 200 टन कोल्डमिक्सचा साठा उपलब्ध करुन घेण्यात आलेला आहे. तसेच काही ठिकाणी रेडिमेक्स कॉँक्रीटचाही वापर केला जात आहे.
मागील 7 जुलैपासून रस्ते दुरुस्तीच्या कामाला अधिक वेग देण्यात आला असून इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात त्या मानाने खड्डे कमी असले तरी खड्डेमुक्त शहर हा लौकीक कायम करण्यासाठी अतिवृष्टीच्या कालावधीतही महानगरपालिकेची यंत्रणा सतर्कतेने काम करीत आहे.
रस्ते दुरुस्तीकरिता आठही विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांपासून कनिष्ठ अभियंत्यांपर्यंत सर्व यंत्रणा कार्यरत असून महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर स्वत: प्रत्यक्ष पाहणी करीत असल्याने यंत्रणा सतर्क झाली असून रस्ते दुरूस्ती कामाला अधिक गतिमानता आली आहे.
खड्डेमुक्त रस्ते हे आपले उद्दिष्ट असून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता आपली यंत्रणा कायम सतर्क असणे व आपत्ती काळात मदतीकरिता तत्पर असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रत्येक अधिकारी, कर्मचा-याने आपापल्या जबाबदारीचे पालन करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिलेले असून सर्वांनी पावसाळी कालावधीत आपला मोबाईल क्रमांक सुरू राहील याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांनीही पावसाळी कालावधीत कोणत्याही मदतीसाठी महानगरपालिकेच्या आपल्या विभागातील आपत्ती निवारण कक्षाशी संपर्क साधावा अथवा महापालिका मुख्यालयातील मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी 022-27567060 / 61 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 1800222309 / 10 या टोल फ्री क्रमांकावर विनामूल्य संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.