गृह विलगीकरणात असूनही बाहेर पडलेल्या दिघ्यातील 3 व कोपरखैरण्यातील 2 व्यक्तींविरुध्द गुन्हा
कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक असून विशेषत्वाने गृह विलगीकरणात (Home Isolation) असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींनी घरातच थांबून कोरोनाची साखळी खंडीत करणे महत्वाचे आहे. गृह विलगीकरणात असलेल्या कोरोना बाधीतांच्या डाव्या हाताच्या तळव्याच्या पाठीमागील बाजूस स्टॅंपींग केले जात आहे. गृह विलगीकरणात असूनही घराबाहेर पडणा-या कोरोना बाधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
अशाप्रकारे गृह विलगीकरणात असुनही घराबाहेर फिरणा-या दिघा विभागातील हिंदमाता विद्यालयाजवळील एका व्यक्तीवर तसेच बिंदू माधव नगरातील दांपत्यावर अशा एकूण 3 व्यक्तींविरोधात रबाळे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या 188 कलमाव्दारे कायदेशीररित्या एफ.आय.आर. नोंदविण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे सेक्टर 11 कोपरखैरणे येथील 2 व्यक्तींविरुध्द कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या 188 कलमाव्दारे कायदेशीररित्या एफ.आय.आर. नोंदविण्यात आला आहे.
गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींनी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार आपल्या घरातच थांबणे अनिवार्य आहे. तरीही बेजबाबदारपणे घराबाहेर पडून सामाजिक आरोग्याला धोका पोहचविणा-या गृह विलगीकरणातील कोरोना बाधीत व्यक्तींविरूध्द अधिक कठोरपणे कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.