हजारो उभरत्या कलाकारांना भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ‘महा-उत्सव’ कौतुकास्पद – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
३० एप्रिल २०२२ मुंबई : ”नवीन कलाकार किती ताकदीचे आहेत, त्यांची कला किती विचार करायला भाग पाडते, हे सारं काही आश्चर्यात टाकणारं आहे. हजारो उभरत्या कलाकारांना भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ‘महा उत्सव’ खरंच कौतुकास्पद आहे. कला आणि प्रेमाचं सर्वोत्तम उदाहरण म्हणावं लागेल. अगदी रस्त्यांवर आपली कला सादर करणाऱ्यांनाही इथे सन्मानपूर्वक वागणूक दिली जात आहे. आतापर्यंत कधीही न पाहिलेली कला इथे पहायला मिळत आहे. या कलाकारांना संधी देण्यासाठी नितीन देसाई यांचं खरंच कौतुक. आपल्या देशाचं जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करणारा हा ‘महा-उत्सव’ एक महामहोत्सव म्हणावा लागेल.” अशा भावना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या. ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आयोजित ‘महा उत्सव’ ला ३० एप्रिल रोजी सकाळी दिलेल्या भेटी दरम्यान ते बोलत होते.
महाराष्ट्राच्या महान परंपरेचा ‘महा-उत्सव’ कर्जत जवळील एन.डी. स्टुडिओमध्ये २८ एप्रिल ते १ मे दरम्यान पार पडत आहे. या उत्सवात महामेळा, महाकला, महाखेळ, महासंस्कृती, महास्वाद, महाव्यवसाय आणि महागौरव असे महाराष्ट्राच्या महान परंपरेचे सप्तरंगी इंद्रधनुष्य अवतरले आहे. ”’ए एस अॅाग्री’ आणि ‘अॅरक्वा एलएलपी’ यांच्याद्वारे सादर करण्यात आलेला अत्याधुनिक व्हर्टिकल फार्मिंग क्लस्टर प्रकल्प वाखणण्याजोगा आहे. मला कौतुक वाटतं की, या उत्सवामध्ये शेतकऱ्यांसाठीही व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं आहे. कृषी क्षेत्रातील हे नवनवीन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी निश्चितच लाभदायक ठरतील.” असेही बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले.
”या महोत्सवाला मोठ्या संख्येने कला रसिक येत असल्याचं पाहून आनंद वाटतो. त्यांचं हे प्रेम, कलाकारांचा सहभाग प्रेरणादायी आहे.” असे नितीन चंद्रकांत देसाई म्हणाले.