महाराष्ट्र

नगर परिषद कर्मचाऱ्यांचे 1 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

उरण दि 28 (विठ्ठल ममताबादे) महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी / संवर्ग कर्मचारी संघटनेच्या अनेक विविध मागण्या आहेत. या मागण्या बाबत संघटनेच्या वतीने अनेकदा पाठपुरावा, पत्रव्यवहार करून देखील शासन दरबारी संघटनेच्या मागण्या मान्य होत नसल्याने संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनी अर्थातच शासकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 1 मे 2022 पासून संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषदेचे तसेच नगर पंचायतचे अधिकारी कर्मचारी वर्ग हे बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत. त्यामुळे पुढे जे काही होईल त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील. असा आक्रमक इशारा महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी / संवर्ग कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश पोसतांडेल यांनी दिला आहे.

विविध मागण्यासाठी संपूर्ण राज्यातील व उरण नगर परिषद मधील अधिकारी / कर्मचारी वर्गांनी पहिल्या टप्प्यात एकत्र येत मागण्या बाबत दिनांक 5 एप्रिल 2022 रोजी काळ्या फिती लावून निदर्शने केली. तरी देखील शासनाने दुर्लक्ष केल्याने दिनांक 1 मे 2022 पासून अत्यावश्यक सेवांसाहित काम बंद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिका, नगरपंचायत / संवर्ग कर्मचारी करतील असे महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष सुरेश पोसतांडेल, राज्यउपाध्यक्ष प्रदीप रावनकर, राज्यसरचिटनिस रामेश्वर वाघमारे, राज्यकोषाध्यक्ष अनिल पवार, राज्य कार्यकारी अध्यक्ष विश्वनाथ घुगे, रायगड जिल्हा अध्यक्ष सुनील जाधव यांनी माहिती दिली. उरण नगर परिषद स्थानिक संघटनेचे अध्यक्ष संतोष तेलंगे, उपाध्यक्ष मिलिंद जाधव, संतोष गुडेकर, सचिव संजय पवार, सहसचिव आकाश कवडे, खजिनदार संजय दाते, सहखजिनदार रमेश सरवदे, कार्याध्यक्ष नितीन कासारे, सह कार्याध्यक्ष नितीन कांबरे, संघटक अनिल जगधणी, झुंबर माने, महिला संघटक सुलोचना हलसे, देवयानी गोडे, मनीषा उमते, भारती करंगुटकर, रशिदा शेख, कांचन तारेकर, सल्लागार धनंजय थोरात, राजेश कदम, संजय डापसे, हरेश तेजी, जयराम पाटील, विजय पवार, धनेश कासारे, सचिन भानुसे, संतोष कांबळे, संजय परदेशी, अनिल कासारे आदी उरण नगर परिषदेचे कर्मचारी या संपात, काम बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत.

राज्यातील दोन लाखावर नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी 1 मे 2022 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत. प्रलंबित मागण्याबाबत प्रदीर्घ काळापासून सरकार तोडगा काढत नसल्याने कर्मचारी संघटनेने हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रातील 369 पेक्षा जास्त नगरपालिका व नगरपंचायतीचे दोन लाखापेक्षा जास्त कर्मचारी 1 मे 2022 पासून महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी / संवर्ग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहे. महाराष्ट्र सरकार या कर्मचाऱ्यांच्या मागण्या कडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने व नगर विकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ऑनलाइन बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय कायम केला आहे. 19 एप्रिल 2022 रोजी नगरपालिका प्रशासन मुंबई यांच्याबरोबरच प्रदीर्घ बैठक होऊन त्याबाबत आश्वासने दिली मात्र ठोस कारवाई केली नाही. दरम्यानच्या काळात संघटनेने वेळोवेळी नगरपालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व नगरविकास मंत्र्यांकडे या मागण्यांबाबत पाठपुरावा केला परंतु मागण्यांबाबत ठोस निर्णय झालेला नाही.

राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला शंभर टक्के वेतन कोषागार मार्फत मिळावे, राज्य सरकारने सहाय्यक वेतन अनुदान ऐवजी वेतन अनुदान मंजूर करावे, दहा-वीस-तीस वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची तीन हप्ते मिळावेत, नव्याने झालेल्या नगरपंचायत येथील सफाई कामगारांसह सर्व कर्मचाऱ्यांना विनाशर्त विनाअट समावेशन करावे, सर्व नवीन नगरपंचायत मधील सफाई कर्मचाऱ्यांची आकृतिबंध यामध्ये पद निर्मिती करावी ,सेवेत असताना मयत झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्काने किंवा अनुकंपा योजनेअंतर्गत नियुक्ती द्यावी, नगर परिषदेचे थकित सहाय्यक अनुदानाची रक्कम त्वरित मिळावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची कायदेशीर देणी एकरकमी द्यावीत तसेच दरमहा निवृत्ती वेतन एक तारखेला द्यावे, हंगामी व ठेकेदार कर्मचाऱ्यांना समान कामाला समान वेतन या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया प्रमाणे वेतन मिळावे तसेच सर्व कायदेशीर लाभ मिळावेत या मागण्यांसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे .या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील सर्व 369 नगरपालिका नगरपंचायती मधील 2 लाखावर कर्मचारी सहभागी होणार असून मागण्या मान्य होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत 1 मे 2022 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी / संवर्ग कर्मचारी संघटनेने केला आहे.

मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 1 मे 2022 महाराष्ट्र दिन (ध्वजारोहनाच्या कार्यक्रमानंतर) सर्व अत्यावश्यक सेवेसह संपूर्ण महाराष्ट्रात बेमुदत काम बंद करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुरेश पोसतांडेल यांनी दिली. सर्व कर्मचाऱ्यांनी या काम बंद आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश पोसतांडेल यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button