महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या महान परंपरेचा ‘महाउत्सव’ प्रथमच साजरा होतोय जेष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

२१ एप्रिल २०२२ मुंबई : महाराष्ट्र! छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिव्य कर्तृत्वानं साकारलेलं स्व-राज्य! साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा, विज्ञान, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला स्वतःची अभिमानास्पद दीर्घ परंपरा आहे. हा वारसा जपत या क्षेत्रात कार्यरत कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या पुढाकाराने प्रथमच महाराष्ट्राच्या महान परंपरेचा ‘महाउत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

कर्जत जवळ चौक इथल्या एन.डी. स्टुडिओच्या ४७ एकरच्या विशाल जागेत दि. २८ एप्रिल ते १ मे दरम्यान हा ‘महाउत्सव’ होणार असून महामेळा, महाकला, महाखेळ, महासंस्कृती, महास्वाद, महाव्यवसाय आणि महागौरव असे महाराष्ट्राच्या महान परंपरेचे सप्तरंगी इंद्रधनुष्य महाराष्ट्रात अवतरणार आहे. या ‘महाउत्सवा’तल्या महामंचावर चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके, गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि रमेश देव यांना समर्पित विशेष कार्यक्रम तसेच महाराष्ट्राचे ‘महाराजे’ छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित महानाट्याचा समावेश आहे.  या महाउत्सवात काही विश्वविक्रम घडणार असून त्यामध्ये पाच हजार शालेय विद्यार्थी रुबीक्स क्यूब सोडवून शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा साकारणार आहेत. एक नवे महाराष्ट्र गीत देखील यावेळी रसिकांना अर्पण केले जाणार आहे.

महाराष्ट्राच्या महान परंपरेच्या आम्ही मांडलेल्या या ‘महाजागरा’ मध्ये केवळ मराठीजनांनी नव्हे तर महाराष्ट्र कर्मभूमी असलेल्या, महाराष्ट्र समजून घेण्याची इच्छा असलेल्या सर्व भाषिक, सर्वप्रांतीयांनी सहभागी व्हावं, अशी विनंती आयोजक नितीन चंद्रकांत देसाई यांनी केली आहे. ‘एन.डी. फिल्म वर्ल्ड’ तर्फे आयोजित या महोत्सवात अनेक सेवाभावी संस्थाचाही सहभाग असून पर्यावरण, विद्यार्थी विकास, जलनियोजन, तसंच नेत्रहीन, कुष्ठरोगी, तृतीयपंथीय यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांचा यात सहभाग आहे. त्यांच्या कार्याला समाजासमोर आणून त्यांना समाजाकडून बळ मिळावं हा देखील प्रयत्न असल्याचे ते पुढे म्हणाले.  

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ! 
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन घडवणारे, मराठयांची गौरव गाथा, मायमराठी लोककला उस्तव, महालावणी उत्सव, बॉलीवूड घराणा, फ्युजन वाद्य संगीत अशा भरगच्च कार्यक्रमाची  रेलचेल आहे. ‘महामेळा’ अंतर्गत राज्याच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन, विक्री होणार असून राज्यभरातून शेकडो छोटे व्यावसायिक आणि दुकानदार यांनी यासाठी नोंदणी केली आहे. ‘महाकला’ उपक्रमाद्वारे राज्यातल्या विविध लोककलांचे मनोहारी दर्शन घडणार असून गोंधळ, जागरण, भारुड, आदिवासी कला, धनगरी नृत्य, मर्दानी कला यांचं दर्शन घडवण्यासाठी १०० हून अधिक पारंपरिक कलावंत या महोत्सवात सहभागी होणार आहेत. जेष्ठ चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकार यांच्या कलाकृतींची दालन तसेच ललित कलेची प्रत्याक्षिके आणि कार्यशाळा देखील महाउत्सवाचे वैशिष्ट्य आहे. ‘महाखेळ’ अंतर्गत महाराष्ट्राची कुस्ती आणि कब्बडीचे स्पर्धात्मक सामने होणार असून त्यातही १०० हून अधिक क्रीडापटू आपलं कौशल्य पणाला लावणार आहेत. ‘महासंस्कृती’ द्वारे महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारे पारंपारिक व्यवसाय, बारा बलुतेदार, कारागिरी यांचे दर्शन घडणार आहे. ‘महास्वाद’अंतर्गत राज्यभरातल्या वैविध्यपूर्ण रुचकर पदार्थांवर खवय्यांना ताव मारता येईल.

‘महाव्यवसाय’ अंतर्गत राज्यातले विविध व्यावसायिक एकत्र येणार असून उद्योगांपुढचे प्रश्न, आगामी काळातल्या जागतिक संधी, प्रतिमा संवर्धन, ‘ब्रॅण्डिंग’ अशा विविध विषयांवर विचारमंथन आणि तरुण पिढीला मार्गदर्शक ठरतील अशी चर्चासत्रे, परिसंवाद होणार आहेत. ‘महागौरव’ उपक्रमांतर्गत राज्यातल्या विविध क्षेत्रातल्या गुणवंतांचा गौरव होणार आहे.  एन. डी. स्टुडिओतल्या रायगड दरबार, शिवनेरी, रॉयल पॅलेस, लाल किल्ला, तसंच मुंबईची खाऊ गल्ली, चोर बाजार, मार्केट, अशा उभारलेल्या आकर्षक सेटस वर तसंच विविध पुरस्कार सोहळ्याचं आयोजन होणाऱ्या मेगा फ्लोअर, टॅलेंट हंट फ्लोअर आणि भव्य खुल्या रंगमंचावर होणारे सांस्कृतिक कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button