गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधितांच्या डाव्या हातावर स्टॅम्पींग
कोव्हीड 19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असताना कोरोना बाधितांवरील उपचारांसाठी वैद्यकीय सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण राखण्यासाठी प्रतिबंधात्मक गोष्टींची काटेकोर अंमलबजावणी करण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.
कोव्हीड 19 अंतर्गत शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार गृह विलगीकरणात (Home Isolation) असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींच्या डाव्या हाताच्या तळहाताच्या मागील बाजूस स्टँम्प मारण्यात येत असून या स्टॅम्पवर ‘Proud to Protect Navi Mumbaikars – HOME QUARANTINED’ (नवी मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी गृह विलगीकरणात असल्याचा अभिमान) असा मजकूर आहे. अशा व्यक्तीने 14 दिवसाच्या विलगीकरणाच्या कालावधीत स्वत:ला इतरांपासून वेगळे ठेवणे गरजेचे आहे.
अशाप्रकारे गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या दरवाज्याबाहेर विलगीकरण कालावधी नमूद केलेला फलक लावण्यात येत असून सदर गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीला त्याच्या जीवनावश्यक बाबींच्या पुरवठ्याची व्यवस्था करण्यात येईल, तथापि त्याने त्याचे घर सोडून बाहेर यावयाचे नाही अशा स्पष्ट सूचना देण्यात येत आहेत.
तथापि तरीही घराबाहेर पडणा-या कोरोनाबाधित व्यक्तीने नियमाचे उल्लंघन केल्यास त्याच्या विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या डाव्या हातावरील तळव्याच्या मागील बाजूस मारण्यात येणा-या स्टॅम्प हा त्यादृष्टीने महत्वाचा असून नागरिकांनी अशाप्रकारे हातावर स्टॅम्प असलेली कोरोनाबाधित व्यक्ती घराबाहेर फिरताना आढळल्यास त्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयास कळवावी असे सूचित करण्यात येत आहे.
त्यानुसार गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींनी स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घेत घरीच थांबावे व डॉक्टरांनी सांगितलेले योग्य उपचार घ्यावेत आणि कोरोनाची साखळी खंडीत करावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री.. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.