कोव्हीड सुरक्षा नियमांचा भंग केल्याने तुर्भे येथील रसना बार सात दिवसांसाठी सील तसेच बेलापूर येथील डी मार्टला 50 हजाराचा दंड
कोव्हीडचा वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नवीन आदेश जारी केले असून त्यानुसार आस्थापनांनी कोव्हीड सुरक्षा नियमांच्या अनुषंगाने उपाययोजना करतानाच उपस्थित असणा-या लोकांमध्ये योग्य सुरक्षित अंतर राहील याकडे लक्ष देणेही गरजेचे आहे.
याबाबत उल्लंघन होऊन मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे आढळल्यास पहिल्या वेळी रू. 50 हजार रक्कमेचा दंड, दुस-या वेळी उल्लंघन झाल्यास 7 दिवसांकरिता आस्थापना बंद ठेवण्याची कारवाई तसेच तिस-यांदा उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास केंद्र सरकारमार्फत कोव्हीड 19 महामारी संपल्याचे जाहीर होत नाही तोपर्यंत आस्थापना पूर्णपणे बंद करण्याची कारवाई करण्यात येईल असे स्पष्टपणे आदेशित करण्यात आले होते.
त्यानुसार यापूर्वी 50 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई होऊनही रात्री 8 नंतरही रेस्टॉरंट-बार सुरू ठेवणा-या तसेच सुरक्षित अंतराच्या नियमांचे उल्लंघन करणा-या सेक्टर 23 तुर्भे येथील रसना बारवर महानगरपालिकेच्या विशेष दक्षता पथकाने धडक कारवाई करीत सात दिवसांसाठी सदर बार सिलींग करण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे सेक्टर 15 सीबीडी बेलापूर येथील डी मार्टनेही सुरक्षित अंतराच्या नियमाचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर 50 हजार दंडात्मक रक्कमेची कारवाई करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या विशेष दक्षता पथकांमार्फत कोव्हीड 19 च्या प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्ती व आस्थापनांवर कारवाई करण्यात येत असून यापुढील काळात ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.