कोपरखैरणे येथे महिला सुरक्षा कायदा मार्गदर्शन चर्चासत्र संपन्न
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
(अनंतराज गायकवाड) लॉक डाऊन मध्ये मोबाईल आणि टीव्ही मध्ये बंदिस्त झालेल्या विद्यार्थ्यांमधील मरगळ जाऊन विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण व्हावे व त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या हेतूने महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या आदेशानुसार घणसोलीतील तेजस्व करिअर ॲकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष निलेश ढाकणे यांच्या सहकार्याने दि. २२ फेब्रुवारी रोजी कोपरखैरणे येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात कॉलेज एनएसएस युनिट आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना महिला सुरक्षा कायदा विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपस्थित वक्त्यांनी विद्यार्थ्यांना उद्द्भवणार्या समस्या विषयी निराकारण कसे करावे याबद्दल पोलिसांची भूमिका काय असावी, पाठपुरावा कसा करावा, डायल 100, 103 यांचा वापर कसा करावा निर्भया पथक, रॅगिंग विषयीचे नवे कायदे, ब्लॅकमेलिंग, सायबर क्राईम, कौटुंबिक कलह, मुलींचे वारस हक्क, छेडछाड आदी विषयांवर सखोल चर्चा करून विद्यार्थ्यांच्या समस्या निराकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले. पीडितांनी न घाबरता अन्याय अत्याचाराला पाठबळ देऊ नये बदनामीला न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा याबाबतीत पोलिसही अशा प्रकरणात गुप्तता पाळून सहकार्य करतात व त्यासाठी विद्यार्थी मित्रांनी बोलके झाले पाहिजे याशिवाय अशा शिबिरांचे आयोजन वारंवार व्हावे जेणेकरून विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावेल अशी आशा उपस्थित मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली.
या चर्चासत्रात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. लक्ष्मण तळणीकर, कोपरखैरणे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता पवार, पत्रकार अनंतराज गायकवाड, तेजस्व अकॅडमिचे संचालक अक्षय आव्हाड यांनी महिला सुरक्षा कायदा या विषयावर विचार मांडले.
यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी सकाळी नऊ वाजता आवर्जून हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील प्रचार समन्वयक सतीश सोनटक्के यांनी आपल्या खास शैलीत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक वृंद, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.