नवी मुंबई

माझी वसुंधरा अभियानातून व्यापक पर्यावरणपूरक चळवळ उभी रहावी – आयुक्त अभिजीत बांगर

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनाची व्यापक चळवळ उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ‘माझी वसुंधरा’ अभियान सुरु केले असून यामध्ये मागील वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेस राज्यातील व्दितीय क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे. हे मानांकन उंचावून “निश्चय केला – नंबर पहिला” असे उद्दिष्ट साकारण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने गतीमान कार्यवाहीस सुरुवात केली असून आज महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यावर्षी अभियानाला सामोरे जात असताना करण्यात आलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला व यामध्ये अधिक व्यापक स्वरुपात काम करण्याचे निर्देश दिले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, प्रशासन विभागाचे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. जयदीप पवार, परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश कडुस्कर, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश या निसर्गाच्या पंचतत्वांना अनुसरून त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे अभियानाचे उद्दिष्ट असून ते साध्य करण्यासाठी अधिक मोठ्या प्रमाणावर अभियानाची जनजागृती करावी व व्यापक लोकसहभागावर भर द्यावा असे आयुक्तांनी यावेळी निर्देशित केले.

माझी वसुंधरा अभियानात पंचतत्वांवर आधारीत उपक्रमांना विविध गुण असून नमूद निकषांनुसार कार्यवाही करावयाची असते. नवी मुंबई महानगरपालिकेचा नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर असतो. त्या अनुषंगाने पर्यावरण संरक्षण, संवर्धनाचा संदेश जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी शालेय स्तरापासून ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरांतील नागरिकांचा सहभाग असणारे उपक्रम आठही विभाग कार्यालय क्षेत्रात व्यापक स्वरुपात राबविण्यावर भर देण्याचे आयुक्तांनी यावेळी सूचित केले. या अनुषंगाने शाळांमध्ये मुलांच्या मनावर लहान वयापासूनच पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण व्हावी यादृष्टीने शाळांमध्ये पर्यावरण विषयक निबंध, चित्रकला, वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे असेही शिक्षण विभागास निर्देशित करण्यात आले.

शहरात ठिकठिकाणी होणा-या सुशोभिकरण कामात माझी वसुंधरा अभियान विषयक जनजागृती व्हावी तसेच पंचतत्वावर आधारीत निर्मिती करण्यात आलेल्या घणसोली येथील सेंट्रल पार्कमध्ये पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचतत्वांचे महत्व नागरिकांना समजेल अशाप्रकारे फलक प्रदर्शित करावे अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

माझी वसुंधरा अभियानात ई वेस्ट व्यवस्थापन, सायकल ट्रॅक, झिरो कार्बन उपक्रम, कार्बन फूट प्रिंट, ई वाहन वापरावर भर देण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन व चार्जींग स्टेशनची प्रचार – प्रसिध्दी, पाणी बचतीवर भर देणारे उपक्रम, पाणी – विद्युत – ऊर्जा यांचे ऑडिट, रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा अनेक महत्वांच्या बाबींवर आगामी काळात भर देण्याचे आयुक्तांनी यावेळी निर्देश दिले.

‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ ला निर्धाराने सामोरे जात असताना ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्येही नवी मुंबई महानगरपालिकेने कार्यवाहीला सुरुवात केलेली असून नागरिकांनीही प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक नवी मुंबईच्या वाटचालीत सक्रीय योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button