नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिध्दीची अधिसूचना जाहीर
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
सन 2022 मध्ये होणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिध्दीची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आज महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी प्रसिध्द केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ nmmcelection.com तसेच www.nmmc.gov.in यावर सदर अधिसूचना व नकाशे नागरिकांना सुलभ रितीने बघण्यासाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे महापालिका मुख्यालय आणि महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालये याठिकाणीही नकाशे व अधिसूचना प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची लोकसंख्या 11 लक्ष 20 हजार 547 इतकी गृहीत धरून ही निवडणूक घेण्यात येणार असून त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 लक्ष 67 तसेच अनुसूचित जमातीची लोकसंख्या 18 हजार 913 नकाशावर नमूद करण्यात आलेली आहे.
यापूर्वीच्या सन 2015 च्या निवडणूकीमध्ये एक सदस्यीय 111 प्रभाग होते. सन 2022 च्या निवडणूक 3 सदस्यीय पॅनल पध्दतीने होणार असून 41 प्रभाग असणार आहेत. यामध्ये 40 प्रभाग हे 3 सदस्यीय व 1 प्रभाग हा 2 सदस्यीय असणार असून एकूण 122 सदस्य असणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या nmmcelection.com तसेच www.nmmc.gov.in या संकेतस्थळांवर प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना मसुदा, प्रारुप प्रभाग रचनेचा एकत्रित नकाशा तसेच प्रभाग निहाय प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा (1 ते 41 प्रभाग) नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध आहेत. आज प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिध्दीची अधिसूचना व नकाशे पाहण्यासाठी नागरिकांनी मुख्यालय व आपल्या नजिकचे विभाग कार्यालय याठिकाणी भेट देऊन नवीन स्वरुपातील प्रभाग रचनेची माहिती घेतली.
सदर प्रसिध्द केलेल्या प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमेबाबत हरकती व सूचना महानगरपालिका आयुक्त यांचेकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय याठिकाणी 1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत सादर कराव्यात असे जाहिर करण्यात आले आहे. सदर हरकती व सूचना दाखल करणा-या नागरिकांना सुनावणी करिता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रसिध्द केलेल्या निवडणूक विषयक जाहीर सूचनेत नमूद करण्यात आले आहे.