“अधिकाऱ्यांची लुट त्याला आयुक्तांची सूट” चा नारा देत पादचारी पुलाला विरोध
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
(अनंतराज गायकवाड) : नवी मुंबई काँग्रेसच्या वतीने वाशी सेक्टर 15 ते सेक्टर 9 येथील पादचारी पुलाला कडाडून विरोध दर्शविला जात आहे. या विरोधात नवी मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून स्थानिक रहिवाशांच्या सह्यांची मोहीम राबविली जात आहे.
मा. तुकाराम मुंढे आयुक्त पदी असताना पादचारी पुलाचा घाट घालण्यात आला होता, परंतु सोळा ते वीस मीटरचा पादचारी पूल बनवणे म्हणजे पैशांचा अपव्यय व नागरिकांची गैरसोय ही बाब लक्षात येताच सेक्टर 9 येथील भाजी मार्केट स्थलांतरित करून बस डेपो जवळ नेले व नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीचा प्रश्न सोडविला. परंतु मनपा अधिकाऱ्यांच्या हेतूपुरस्पर या निर्णयाची अंमलबजावणी योग्यरीत्या न केल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पादचारी पुलाचा घाट घालत हफ्ते खोरी टिकवण्या बरोबरच टक्केवारी मिळवण्यात अधिकारी यशस्वी झालेत.
याशिवाय पूल बनवण्यासाठी उत्साही असलेले अधिकारी सेक्टर 15, येथील पाण्याची टाकी जीर्ण अवस्थेत धोकादायक असल्याचा पवई आयआयटी मुंबई चा अहवाल येऊन चार महिने उलटले तरी देखील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात उदासीनता दाखवत असल्याचे चित्र स्थानिक नागरिकांना पहावयास मिळत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी या रस्त्या चा वापर करू नये असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
या दोन्ही विषयासंदर्भात विद्यमान आयुक्त मा. अभिजीत बांगर यांच्याशी नवी मुंबई काँग्रेस सरचिटणीस मा. वैभव सावंत यांनी पाठपुरावा केला असून प्रत्यक्ष भेट घेऊन दोन्ही गंभीर विषया बाबत चर्चा करण्यात आली होती. तरी देखील नागरिकांच्या गैरसोयीचा ठरणाऱ्या पादचारी पूल बांधण्यात येत आहे म्हणूनच “अधिकाऱ्यांची लूट त्याला आयुक्तांची सूट” म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.