नवी मुंबईतील सर्व शाळा २४ तारखेपासून सुरु
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळा / विद्यालयातील
पूर्वप्राथमिक ते इयत्ता बारावी चे वर्ग दि.24 जानेवारी 2022 पासून अध्ययन अध्यापनाला प्रत्यक्ष सुरूवात
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अधिक काळजी घेण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचेमार्फत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळता अन्य वर्गासाठी (इयत्ता पहिली ते नववी व अकरावी) च्या सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळा दि. 04 ते 30 जानेवारी 2022 पर्यंत अध्यापनासाठी प्रत्यक्ष बंद ठेवून ऑनलाईन शिक्षण देण्याचे आदेश शाळांना देण्यात आले होते.
दि. 20 जानेवारी, 2022 च्या शासन परिपत्रकान्वये शैक्षणिक वर्ष 2021-2022 करिता नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा/विद्यालयातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता बारावीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करणेबाबत मार्गदर्शक सूचना शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या सर्व संबंधित तरतूदीसह तसेच दि. 20 जानेवारी, 2022 च्या शासन परिपत्रकान्वये कोव्हीड-19 बाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करण्याच्या अधीन राहून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळांचे पूर्वप्राथमिक ते इयत्ता बारावी पर्यंतचे वर्ग यामधील अध्ययन, अध्यापन दि. 24 जानेवारी 2022 पासून प्रत्यक्ष सुरू करणेसाठी खालील दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणेच्या अटीवर महापालिका आयुक्त यांनी मान्यता दिलेली आहे.
1) कोव्हीडसंबंधी सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे.
2) विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखणे.
3) सतत हात साबणाने स्वच्छ धुणे व मास्कचा वापर अनिवार्यपणे करणे.
4) विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळणेसाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देण्यात येऊ नये.
5) विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा तात्पुरती बंद करून कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांचा वर्ग व शिक्षकांना विलगीकरण करणे तसेच शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करून घेणे.
6) शाळा सुरू करतांना विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, या अनुषंगाने शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांना टप्प्या-टप्प्याने शाळेत बोलविण्याबाबत कार्यवाही करावी.. उदा. वर्गांना अदलाबदलीच्या दिवशी / सकाळी-दुपारी/ 50:50 उपस्थिती याप्रमाणे.
7) शासन परिपत्रक दिनांक 20/01/2022 मधील परिशिष्ट-अ मधील क्र. 6 नुसार विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विद्यार्थी शाळेत पाठविण्याबाबतचे संमतीपत्र प्राप्त करून घेणे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र प्राप्त होणार नाही त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अध्ययन अध्यापनाचे कार्य सुरू ठेवणे.
8) शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणे.
सध्याची कोव्हीड-19 साथरोगाची परिस्थिती लक्षात घेता सर्व पालकांनी आपल्या पाल्याची आरोग्य विषयक सर्वोतोपरी काळजी घ्यावी तसेच त्यांना शाळेच्या आवारात सुरक्षितपणे पोहचवावे त्याचप्रमाणे सर्व शाळा व्यवस्थापनांनी कोव्हीडच्या काळातील विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती लक्षात घेऊन शाळेमध्ये आनंददायी वातावरण निर्माण करावे त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी सर्वोतोपरी काळजी घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांनी केले आहे.