नवी मुंबई

शहर सुशोभिकरण कामांना गती देण्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ मध्ये देशातील मोठया शहरामध्ये प्रथम क्रमांकाचा बहुमान संपादन करताना नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील भिंती, उड्डाणपूल, अंडरपास यावरील रंगचित्रे, मुख्य चौकातील शिल्पाकृती, कारंजे अशा विविध गोष्टींनी शहराचे रुप आधिक सुंदर झाल्याचे अभिप्राय येथील नागरिकांप्रमाणेच शहराला भेटी देणा-या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व प्रवाशांकडून देण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षणांच्या मानांकनात व पुरस्कार चित्रफितीमध्येही याचा विशेष उल्लेख करण्यात आला.

या अनुषंगाने यावर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ ला उत्साहाने सामोरे जाताना मागील वर्षीच्या सुशोभिकरण संकल्पनांमध्ये नाविन्यपूर्णता आणत शहराचे स्वरुप अधिक आकर्षक करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिल्या होत्या. याबाबतचा आढावा घेताना शहरात सुरू असलेल्या सुशोभिकरण कामांची छायाचित्रे अवलोकन करीत आयुक्तांनी या कामाला गती देण्याचे निर्देश दिले. या आढावा बैठकीप्रसंगी शहर अभियंता श्री संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील व श्री.शिरीष आरदवाड आणि इतर कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ च्या अनुषंगाने सुशोभिकरण कामे करताना मागील वर्षी काढलेली व अजूनही चांगल्या स्थितीत असलेली भिंतीचित्रे पाण्याने स्वच्छ करुन घ्यावीत व आवश्यक त्या दर्शनी ठिकाणी नवीन चित्रे काढावीत आणि त्यामध्ये नवी मुंबईतील प्रत्येक भागाला समाविष्ट करावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. नव्याने काढावयाच्या भिंतीचित्रांमध्ये नवनवीन नजरेत भरतील अशा आकर्षक चित्र संकल्पना साकाराव्यात अशाही सूचना त्यांनी केल्या.

मागील वर्षी जे.जे. स्कुल ऑफ आर्ट्सच्या विदयार्थ्यांनी अभिनव चित्र संकल्पना राबविल्यामुळे शहराचे रुपच बदलून गेल्याचे नागरिकांना जाणवले व तसे अभिप्राय सर्व स्तरांतून व्यक्तही करण्यात आले याचा विशेष उल्लेख आयुक्तांनी केला. यावर्षीही नव्या संकल्पनांसह जे.जे. स्कुल ऑफ आर्ट्सच्या विदयार्थ्यांप्रमाणेच इतरही कला महाविदयालयांच्या विदयार्थ्यांना या कामात सहभागी करुन घ्यावे असे आयुक्तांनी सूचित केले.

भिंतीचित्रांमधून ‘फ्लेमिंगो सिटी’ म्हणून नवी मुंबईची असलेली ओळख अधोरेखीत व्हावी याचे प्रभावी सादरीकरण करण्यात यावे, तसेच भिंतीचित्रांप्रमाणे मुख्य चौक, कॉर्नर, दुभाजक अशा दर्शनी ठिकाणी आकर्षक शिल्पाकृती उभाराव्यात व त्यातही ‘थ्री आर’ संकल्पनेनुसार टाकाऊपासून टिकाऊ शिल्पाकृतींचा अंतर्भाव असावा असे आयुक्तांनी सूचित केले.

जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात नवी मुंबईत होणा-या 17 वर्षाखालील आशियाई महिला फुटबॉल चषक स्पर्धेच्या निमित्ताने जगभरातील विविध देशातील महिला फुटबॉलपटू नवी मुंबईत येणार असून या स्पर्धेचे यजमानपद भूषविताना जानेवारीत होणारी अशियाई फुटबॉल स्पर्धा व त्यानंतर 6 महिन्यांनी होणारी फिफा फुटबॉल स्पर्धा या अनुषंगाने सुशोभिकरणामध्ये फुटबॉल खेळाच्या चित्र व शिल्पांचा समावेश शहरातील मुख्य ठिकाणी सुशोभिकरण कामात करावा अशाही सूचना आयुक्तांनी केल्या.

याशिवाय शहरातील सर्व भागात प्रमुख ठिकाणी विविध प्रकारची कारंजी बसविण्यात यावी असे सूचित करतानाच ती कारंजी नियमीत सुरू राहतील याची काटेकोर काळजी घेण्याचेही निर्देशित करण्यात आले. कारंज्यांमध्ये प्रक्रियाकृत पाणी वापरण्याच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यपध्दतीची नोंद स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून ती तशीच कार्यान्वित राहील याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

विशेषत्वाने सायन पनवेल महामार्गावरुन दररोज मोठया प्रमाणावर वाहतूक होत असून त्याठिकाणची सुशोभिकरण कामे अधिक कल्पकतेने करावीत तसेच प्रवाशांना आपण नवी मुंबई शहरातून प्रवास करत आहोत असा फरक जाणवावा अशा प्रकारे कामे करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. अशाच प्रकारे रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूच्या दर्शनी भिंती चित्रांकित करुन सुशोभित कराव्यात असेही निर्देशित करण्यात आले. उच्चस्तरीय व भूमीगत जलकुंभाच्याही सुशोभिकरणाविषयी आयुक्तांनी सूचना केल्या.

शहर सुभोभिकरण कामांना वेग देतानाच सध्या कोव्हीड बाधितांची झापाट्याने वाढती संख्या लक्षात घेऊन दुस-या लाटेनंतर रूग्णसंख्या कमी झाल्याने बंद करण्यात आलेली कोव्हीड सेंटर्स पुन्हा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आवश्यक स्थापत्य व विद्युत दुरूस्तीविषयक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश आयुक्तांनी याप्रसंगी दिले.

सुशोभिकरणामुळे शहराचे रूप सुंदर व आकर्षक होते आणि त्याचा सकारात्मक परिणाम नागरिकांच्या मानसिकतेवर होऊन शहर स्वच्छतेला पूरक वातावरणनिर्मिती होते तसेच पारितोषिक स्वरूपात त्याची नोंदही घेतली जाते हे लक्षात घेत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ ला सामोरे जाताना या कामांना गती द्यावी असे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अभियांत्रिकी विभागास निर्देशित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button