नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील इयत्ता पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग प्रत्यक्ष अध्यापनासाठी बंद ठेवून ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरू राहणार
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
दिनांक 07 जुलै, 2021 व दिनांक 10 ऑगस्ट, 2021 या शासन परिपत्रकान्वये राज्यातील शाळा, विद्यालयातील वर्ग सुरू करणेबाबत शासनाकडून यापूर्वीच मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. दिनांक 24 सप्टेंबर, 2021 च्या शासन परिपत्रकान्वये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळांचे वर्ग दिनांक 04/10/2021 पासून सुरक्षितपणे सुरू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. तसेच दिनांक 29 नोव्हेंबर 2021 च्या शासन परिपत्रकानुसार ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी तसेच शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवी चे वर्ग दिनांक 01/12/2021 पासून सुरक्षितपणे सुरू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील इयत्ता आठवी ते बारावीच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा व विद्यालये दिनांक 04/10/2021 पासून व इयत्ता पहिली ते आठवी चे वर्ग दिनांक 01/12/2021 पासून सुरक्षितपणे सुरू करणेबाबत आदेश निर्गमित केले होते.
तथापि, सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या स्ट्रेनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अधिक काळजी घेण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळता अन्य वर्गांसाठीच्या (इयत्ता पहिली ते नववी व अकरावी) सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळा दिनांक 04/01/2022 ते 30/01/2022 पर्यंत अध्यापनासाठी प्रत्यक्ष बंद ठेवणे व सदर वर्गांचे शिक्षण ऑनलाईन पध्दतीने नियमित सुरू ठेवणे तसेच इयत्ता दहावी व बारावी चे वर्ग यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सुरू ठेवण्याचे आदेश शाळांना दिलेले आहेत. त्याचप्रमाणे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी शाळेत बोलाविता येईल आणि सदर वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण होईल, याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आलेले आहेत.