पहिल्याच दिवशी 15 ते 18 वयोगटातील 8870 मुलांचे लसीकरण
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली असून ३/१/२०२२ रोजी 8870 हजारहून अधिक विद्यार्थ्यांचे कोव्हीड लसीकरण कऱण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर नवी मुंबई महानगरपालिकेने योग्य नियोजन केले असून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचेही 206 शाळांमध्ये 3 ते 10 जानेवारी या कालावधीत नियोजन कऱण्यात आले आहे.
त्यानुसार ३/१/२०२२ रोजी लसीकरणाच्या पहिल्या दिवशी 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रातील 36 शाळांमध्ये लसीकरणाची विशेष सत्रे आयोजित करण्यात आली होती. शाळांमार्फत कोणत्या वेळी कोणत्या विद्यार्थ्याचे लसीकरण होणार याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. त्यास अनुसरून विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह नियोजित वेळेत उपस्थित राहून कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला. 8 दिवसात 72823 विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून शाळांना काही अडचणी आल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत केंद्र समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे.
३/१/२०२२ रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सुरु झालेल्या लसीकरणाला 15 ते 18 वयोगटातील मुलांनी उत्साही प्रतिसाद दिला. शाळेने दिलेल्या संदेशानुसार नियोजित वेळेत पालकांसह विद्यार्थी उपस्थित होते. शासनाच्या कोव्हीड पोर्टलवर त्यांच्या नावाची व संपर्क क्रमांकाची नोंद झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या किंवा पालकाच्या मोबाईलवर आलेल्या ओटीपी नुसार विद्यार्थ्यांचे लसीकरण कऱण्यात आले.
15 ते 18 वयोगटातील मुलांना कोव्हीड लसीकरणाव्दारे संरक्षित करण्यासाठी नमुंमपा क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली असून पालकांनी आपल्या पाल्याच्या शाळेकडून लसीकरणासाठी उपस्थित राहण्याच्या वेळेचा संदेश प्राप्त झाल्यानंतर मोबाईलसह उपस्थित राहून पाल्याचे लसीकरण करून घ्यावे व लसीकरण झाल्यानंतरही मास्कचा वापर नियमित करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.