31 डिसेंबरला कोव्हीड नियमांचे उल्लंघन झाल्याने 4 लक्ष 70 हजार रक्कमेची दंड वसूली
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
31 डिसेंबर आणि नववर्ष स्वागताच्या अनुषंगाने सध्याची कोव्हीड बाधितांची मोठ्या प्रमाणावर वाढती संख्या आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करीत नववर्षाचे स्वागत साधेपणाने करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात आले होते. या अनुषंगाने सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्यास अनुसरून विभाग कार्यालय स्तरावरील दक्षता पथके तसेच मुख्यालय स्तरावरील विशेष दक्षता पथकांमार्फत कोव्हीड नियमांच्या पालनाबाबत बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. व ज्याठिकाणी कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीचे उल्लंघन होताना आढळले त्याठिकाणी दंडात्मक कारवाई करून एकूण 4 लक्ष 70 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
यामध्ये सेक्टर 40, नेरूळ येथील सीवूड वाईन्स आणि सेक्टर 10 वाशी येथील संजय लंच होम यांचेकडून प्रत्येकी रू. 10 हजार याप्रमाणे दंड वसूल करण्यात आलेला आहे.
तसेच आपल्या रेस्टॉरंट, बारच्या 50 टक्के क्षमतेपेक्षा अधिक गर्दी असलेल्या 9 ठिकाणी म्हणजेच सेक्टर 3 ऐरोली येथील हॉटेल साईप्रकाश, सेक्टर 2 ऐरोली येथील प्रियंका हॉटेल, सानपाडा रेल्वे स्टेशनजवळील रसोई रेस्टॉरंट अँड बार तसेच शालीन रेस्टॉरंट, एपीएमसी मार्केट तुर्भे जवळील विसावा हॉटेल, पामबीच गॅलरिया येथील एजंट जॅक्स बार, बेलापूर येथील फ्लेमिंगो रेस्टरंट, सेक्टर 7 कोपरखैरणे येथील लक्ष्मी हॉटेल व सेक्टर 14 कोपरखैरणे येथील न्यू पंचरत्न हॉटेल यांच्याकडून कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्यापोटी प्रत्येकी 50 हजार प्रमाणे दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. नवी मुंबईकर नागरिकांनी व विविध आस्थापनांनी कोव्हीड नियमांचे उल्लंघन करून कोव्हीड प्रसाराचे कारण बनू नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सतत आवाहन केले जात असून प्रत्येक आस्थापनेने मास्क नाही व लसीकरण नाही तर प्रवेश नाही हे ध्यानात घेऊन कोव्हीड नियमावलीचे पालन करावे आणि दंडात्मक कटू कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.