नवी मुंबई

कोव्हीड प्रतिबंधात्मक उल्लंघनापोटी दोन दिवसात 2 लक्ष 80 हजाराहून अधिक दंडत्मक वसूली

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

ख्रिसमस व आगामी नववर्ष साजरे करताना नागरिकांनी कोव्हीड बाधितांची दैनंदिन वाढती संख्या आणि ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन हे सण, उत्सव साधेपणाने साजरे करावेत असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले असून कोरोना प्रतिबंधक नियमांचे नागरिकांकडून काटेकोर पालन केले जात असल्याबाबत अत्यंत सतर्क राहण्याचे निर्देश महानगरपालिकेच्या विशेष दक्षता पथकांना देण्यात आले आहेत.

या अनुषंगाने विभाग कार्यालय स्तरावरील दक्षता पथकांनी तसेच मुख्यालय स्तरावरील विशेष दक्षता पथकांनी विविध समारंभ स्थळे, सार्वजनिक जागा, आस्थापना येथे अचानक भेटी देत कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिक / आस्थापना यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये मास्क न वापरणा-या नागरिकांकडून 1 लक्ष 45 हजार 500 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली असून सुरक्षित अंतर नियमावलीचे उल्लंघन करणा-या नागरिक / आस्थापनांकडून रु.20 हजार 600 इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. याशिवाय कोव्हीड नियमावलीचे उल्लंघन करणा-या आस्थापनांकडून 1 लक्ष 15 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे शनिवारी ख्रिसमस व त्यानंतरचा रविवार अशा 2 दिवसात एकूण 2 लक्ष 81 हजार 100 इतका दंड महानगरपालिकेच्या दक्षता पथकांनी वसूल केला आहे.

यामध्ये वाशी विभागात सेक्टर 30 ए येथील इनॉर्बिट येथील केएफसी सफायर फुड्स येथे 50 टक्के क्षमतेपेक्षा जास्त उपस्थिती असल्याने रु. 50 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच हार्ड केसल (मॅक़डोनल्ड्स) यांच्याकडून रु. 15 हजार इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे मराठी साहित्य संस्कृती मंडळ सेक्टर 6 (रु.5000/-), ब्लु इम्पिरियल बेंक्वेट हॉल (रु.10,000/-), साई पॅरेडाईज बेक्वेंट हॉल (रु.15,000/-), आएशा सलून (रु.2000/-), एनएमएसए बेक्वेट हॉल (रु.2500/-), बंगाली असोसिएशन हॉल (रु.1500/-), तुंगा बेक्वेट हॉल (रु.6000/-), मर्चंट जिमखाना बेक्वेट हॉल (रु2500/-) अशा विविध समारंभ, शुभविवाह स्थळे याठिकाणीही काटेकोर लक्ष ठेवून मास्क न वापरल्याबाबत दंडात्मक वसूली करण्यात आलेली आहे.

बेलापूर विभागामध्ये सेक्टर 42 येथील अपना बाजार, चारभुजा स्विट्स, तिरुपती डोसा या आस्थापनांकडून प्रत्येकी रु.10,000/- असा एकूण रु.30,000/- इतका दंड वसूल करण्यात आला.

ऐरोली विभागामध्ये सेक्टर 15 येथील हेगडे भवन सभागृहात कोव्हीड नियमांचे उल्लंघन झाल्यापोटी रु.10,000/- इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. तुर्भे विभागामध्येही मॅफको मार्केट येथील नरेंद्र वाईन्स या आस्थापनेकडून रु.10,000/- इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे.

अशाच प्रकारे मुख्यालय स्तरावरील विशेष पथकांनी सेक्टर 14 कोपरखैरणे येथील पंजाब चायनीज तसेच सेक्टर 14 बेलापूर येथील राधा कृष्ण डेअरी या आस्थापना रात्री 12 नंतरही सुरु असल्याचे आढळल्याने कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावली अंतर्गत प्रत्येकी रु.10,000/- इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.

ओमायकॉन व्हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेता लसीकरण झाले असले तरी कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क हीच सर्वात प्रभावी बचावात्मक ढाल असल्याचे लक्षात घेऊन प्रत्येकाने मास्कचा अनिवार्यपणे वापर करावा तसेच सुरक्षित अंतर व स्वच्छ हात धुणे या कोव्हीडच्या त्रिसूत्रीचे पालन करावे आणि कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करून सामाजिक आरोग्याला धोका निर्माण करू नये असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button