नवी मुंबई

15 ते 18 वयाची मुले, आरोग्यकर्मी, कोरोना योध्दे, 60 वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिक यांच्या लसीकरणाच्या नियोजनासाठी आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घेतली विशेष बैठक

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

कोव्हीड रुग्णांची मागील काही दिवसांपासून वाढती संख्या तसेच ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन दररोज 10 हजार टेस्ट्सपर्यंत केले जाणारे कोव्हीड टेस्टींग कमी होऊ न देता त्यामध्ये वाढ करण्याचे निर्देश देण्याप्रमाणेच दोन्ही डोस घेणा-या नागरिकांच्या 85 टक्केपर्यंत झालेल्या लसीकरण प्रमाणातही वाढ करुन कोव्हीड लसीकरणाला वेग देण्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्यामार्फत आरोग्य विभागास सूचित करण्यात आले आहे.

कोव्हीड व्हेरियंटचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोव्हीड लसीकरणाव्दारे जास्तीत जास्त नागरिक संरक्षित व्हावेत यादृष्टीने पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले असून 10 जानेवारीपासून आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे 60 वर्षावरील नागरिक यांनाही “प्रतिबंधात्मक डोस” दिला जाणार आहे.

या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत लसीकरणाचे नियोजन करण्यासाठी आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी तातडीने बैठक घेत या लसीकरणासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कटके उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेने जलद गतीने लसीकरण पूर्ण करण्याकडे कोव्हीड सेंटर्स संख्येत 101 पर्यंत वाढ करून सुरुवातीपासूनच काटेकोरपणे लक्ष दिल्याने 18 वर्षावरील 100 टक्के नागरिकांना कोव्हीड लसीचा पहिला डोस पूर्ण करणारी नवी मुंबई ही एमएमआर क्षेत्रातील पहिली महानगरपालिका होती. त्यानंतर दुस-या डोसच्या पूर्णत्वाकडेही विशेष लक्ष देत लसीकरणाला वेग देण्यात आला असून 85 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत.

लसीकरणाचा आढावा घेताना उर्वरित नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करून घेण्यावर भर देण्याप्रमाणेच नव्याने समाविष्ट होणा-या 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी पहिला डोस त्याचप्रमाणे दोन्ही डोस पूर्ण झालेले आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे आणि सहव्याधी असणारे 60 वर्षावरील नागरिक यांना “प्रतिबंधात्मक डोस” देण्याबाबत नवीन सेंटर्स सुरु करण्याचे नियोजन करण्याबाबत आयुक्तांनी निर्देश दिले.

त्यासोबतच सोसायट्यांमध्ये जाऊनही लसीकरण करण्याचा आराखडा तयार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. सध्या कार्यान्वित नसलेल्या कोव्हीड केअर सेंटर्सचाही उपयोग लसीकरणासाठी करण्याबाबत विचार करण्याचे आयुक्तांनी यावेळी सूचित केले. 15 ते 18 वयोगटातील लसीकरणासाठी शाळांमध्ये लसीकरणाची पथके पाठवून लसीकरण करण्याबाबत सांगोपांग विचार करावा व नियोजन करावे असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तत्परतेने केली जात असून पंतप्रधान महोदयांनी जाहीर केल्याप्रमाणे 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोव्हीड लसीचा पहिला डोस तसेच दोन्ही डोस घेतलेल्या आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे 60 वर्षावरील नागरिक यांना “प्रतिबंधात्मक डोस” देण्याबाबतचे नियोजन करण्यास त्वरित सुरुवात करण्यात आलेली आहे. सर्व महापालिका रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रे यांच्या वेबसंवादाव्दारे घेतल्या जाणा-या नियमित बैठकीमध्ये आयुक्त या नवीन लसीकरणाविषयी सविस्तर चर्चा करणार असून तत्परतेने लसीकरण करून घेण्याकरिता वैद्यकीय अधिकारी यांना सूचना दिल्या जाणार आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जात असून नागरिकांनीही विहित वेळेत लसीकरण करून घ्यावे तसेच लसीकरण झाल्यानंतरही मास्कचा नियमित वापर करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button