स्वच्छ सर्वेक्षण 2022 लघुपट व जिंगल स्पर्धा सहभागाचे आवाहन
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ ला सामोरे जाताना लोकसहभागावर भर दिला जात असून नागरिकांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहित करावे व त्यामधून स्वच्छता जनजागृती कार्यामध्ये हातभार लागावा यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार चित्रकला, पथनाट्य स्पर्धा संपन्न झाल्या आहेत. अशाच प्रकारे विशेषत्वाने तरूणाईचा स्वच्छता जागृती कार्यात सहभाग असावा यादृष्टीने ‘लघुपट स्पर्धा (Short Film Compitation)’ आणि ‘जिंगल स्पर्धा’ आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
लघुपटाच्या माध्यमातून स्वच्छ व सुंदर नवी मुंबईचे चित्र मांडले जावे व स्वच्छताविषयक जागरुकता निर्माण व्हावी याकरिता ‘लघुपट स्पर्धा (Short Film Compitation)’ आयोजित करण्यात आली असून यामध्ये सहभागाकरिता (1) माझे शहर – माझा सहभाग, (2) प्लास्टिकमुक्त नवी मुंबई, (3) 3R (Reduce, Reuse, Recycle) या 3 विषयांवर लघुपट निर्मिती करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे. यामधील पहिल्या 3 क्रमांकाच्या लघुपटांना अनुक्रमे रु.25 हजार, 15 हजार व 10 हजार रक्कमेची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
याकरिता लघुपटाचे छायाचित्रीकरण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातच करणे बंधनकारक असून लघुपटाचा कालावधी नामावलीसह 2 ते 5 मिनिटांचाच असणे बंधनकारक आहे. 27 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लघुपट स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख असून 30 डिसेंबर रोजी लघुपटाचे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.
अशाच प्रकारे गीत-संगीत क्षेत्रात कार्यरत कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणारी ‘जिंगल स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. ‘स्वच्छ – सुंदर नवी मुंबई’ या विषयावर आधारित 1 ते 3 मिनीटे कालावधीची मराठी भाषेतील जिंगल MP 3 फॉर्मेटमध्ये सादर करावयाची असून त्यामध्ये ‘निश्चय केला – नंबर पहिला’ हे घोषवाक्य अंतर्भूत असणे गरजेचे आहे. सर्वोत्तम 3 जिंगल्सना अनुक्रमे रु. 15 हजार, 10 हजार, 7 हजार अशी पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. जिंगल स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आहे.
‘लघुपट स्पर्धा (Short Film Compitation)’ आणि ‘जिंगल स्पर्धा’ सहभागाकरीता अधिक माहितीसाठी 9152099255 किंवा 9152199255 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावयाचा असून इमेल आयडी nmmcshortfilms2022@gmail.com यावर आपला लघुपट अथवा जिंगल सादर करावयाची आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये नागरिकांना प्राधान्य ही भूमिका नजरेसमोर ठेवून विविध उपक्रम राबविले जात असून लोकसहभागाला महत्व देणा-या लघुपट व जिंगल स्पर्धेत सहभागी होऊन नवी मुंबईच्या स्वच्छताविषयक नावलौकीकात भर घालावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.