नमुंमपा गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान सोहळा
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी शिक्षण पध्दती अवलंबिण्याकडे अधिक लक्ष दिले जात असून गुणवंत विद्यार्थी व त्यांना घडविणारे मार्गदर्शक शिक्षक यांच्या सत्कारातून इतर मुलांना व शिक्षकांना प्रेरणा मिळेल असे मत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक सन्मान सोहळ्याच्या निमित्त ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, शिक्षण विभागाचे उप आयुक्त श्री. जयदिप पवार, मुख्य लेखा परीक्षक श्री. जितेंद्र इंगळे, उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, श्री. मनोजकुमार महाले, डॉ. श्रीराम पवार, ई.टी.सी. केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरिष आरदवाड, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. निलेश नलावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
शिक्षक हे भविष्यातील पिढी घडविण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करणे हे समाजाचे कर्तव्य असून आजचा सन्मान सोहळा शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा असल्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सांगितले. 159 इतक्या मोठ्या संख्येने नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील मुले शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत चमकली, तसेच दहावीच्या शालांत परीक्षेतही विद्यार्थ्यांनी अत्युत्तम गुण संपादन करीत नवी मुंबईच्या नावलौकीकात भर घालण्याचे काम केले याचा अभिमान वाटतो असे आयुक्त म्हणाले.
शिक्षण आणि आरोग्य हे आपले प्राधान्यक्रम असून महानगरपालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांना आधुनिक जगाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगत त्यादृष्टीने बायजू सारखे शैक्षणिक ॲप उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आयुक्त म्हणाले. अत्यंत खर्चीक असलेले हे ॲप आपल्या विद्यार्थ्यांना सीएसआर निधीतून मोफत उपलब्ध करून देण्यात येत असून याची किंमत व शैक्षणिक मूल्य ओळखून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहचविण्याचा व त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त वापर होईल यावर शिक्षकांनी बारकाईने लक्ष द्यावे असे आयुक्तांनी सूचित केले. याचा वापर योग्य रितीने झाला तर मुलांमध्ये उत्सुकता, जिज्ञासू वृत्ती वाढेल व मुले झपाट्याने प्रगती करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आयुक्तांनी परीक्षेतील गुण हे महत्वाचे आहेतच, मात्र त्यापेक्षा महत्वाचे आहे ते विषय समजणे असे स्पष्ट करीत त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न विचारण्याची उत्सुकता निर्माण झाली पाहिजे असे ते म्हणाले. सध्या संगणक, मोबाईलसारखी माहितीचा प्रचंड खजिना असणारी आयुधे आपल्याकडे असून त्याचा वापर कशा रितीने करायचा याचे भान राखणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. आपण गुगलवर काय शोधतो यावर आपला भविष्यकाळ अवलंबून असून जीवनातील 15 ते 25 हा वयाचा कालावधी आपण पुढे काय होणार यासाठी सर्वात महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. वाचनामुळेच व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास होतो त्यामुळे आपण काय वाचावे याची चोखंदळपणे निवड करून जास्तीत जास्त वाचन करावे असा संदेश त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक क्षेत्रातील नावलौकिकात विद्यार्थी व शिक्षकांप्रमाणेच पालक, स्वयंसेवी संस्था व जागरुक लोकप्रतिनिधी यांचाही महत्वाचा वाटा असल्याचा विशेष उल्लेख आयुक्तांनी यावेळी केला.
शिक्षण विभागाचे उप आयुक्त श्री. जयदिप पवार यांनी आपल्या मनोगतात कोव्हीड प्रभावीत काळात मागील 2 वर्षे होऊ न शकलेला विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे संपूर्ण पालन करून आज संपन्न होत असल्याबद्दल सर्वांच्या वतीने समाधान व्यक्त केले. आधुनिक शिक्षण साधनांचा वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत नमुंमपा पॅटर्न पर्यंत प्रगती करावयाची आहे असा संकल्प व्यक्त करीत तो सर्वांच्या सहयोगाने यशस्वी करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या 53 प्राथमिक, 21 माध्यमिक व 2 सीबीएसई शाळा कार्यरत असून 36720 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये तसेच शालांत परीक्षांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी नेहमीच उज्वल यश संपादन केलेले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला व क्रीडा गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यात आल्याने विविध स्पर्धांमध्येही महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
अशाच प्रकारे विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांचे आयुक्तांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आले. यामध्ये हिमाचल प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत अंतिम विजेतेपद संपादन केलेल्या महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करणारा नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजर्षी शाहू महाराज विद्यालय शाळा क्र. 55, आंबेडकर नगर येथील विद्यार्थी आशिष गौतम यांस अत्युत्कृष्ट खेळाबद्दल खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने भरत पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका शाळांचे नाव देश पातळीवरील उंचाविणा-या आशिष गौतम याचा याप्रसंगी आयुक्तांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. आशिषचे क्रीडा प्रशिक्षक श्री. प्रताप शेलार व श्री. स्वप्निल पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले.
तसेच बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाच्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये रौप्यपदक आणि बालवैज्ञानिक किताब संपादन करणारा नमुंमपा शाळा क्र. 31 कोपरखैरणे येथील विद्यार्थी अथर्व महेंद्र मोरे यासही सन्मानित करण्यात आले.
त्याचप्रमाणे आयआयटी गोहाटी यांच्या वतीने आयोजित टेक एक्स्पो या राष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान विषयक स्पर्धेमध्ये नमुंमपा शाळा क्र. 42 घणसोली येथील विद्यार्थिनी स्नेहल संतोष महानवर हिचा राष्ट्रीय स्तरावर मानांकन प्राप्त केल्याबद्दल गौरव करण्यात आला.
तसेच नमुंमपा शाळा क्र. 28 वाशी येथील विद्यार्थिनी वेदांती सुजीत घरत हिने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत आर्ट थेरपी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तिचा विशेष सन्मान करण्यात आला.
शालांत परीक्षेत उत्तम गुण संपादन करून उज्वल यश मिळविणा-या सन 2019-20 व सन 2020-21 या वर्षातील प्रथम 3 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
तसेच इयत्ता 5 वी ची शिष्यवृत्ती प्राप्त करणारे 32 विद्यार्थी, इयत्ता 8 वी ची शिष्यवृत्ती प्राप्त करणारे 12 विद्यार्थी तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांकरिता इयत्ता 8 वी ची शिष्यवृत्ती (NMMS) प्राप्त करणारे 115 विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. त्यांच्यासोबत 124 मार्गदर्शक शिक्षकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
त्याचप्रमाणे सन 2019 मधील 4, सन 2020 मधील 20 व सन 2021 मधील 15 अशा एकूण 39 सेवानिवृत्त शिक्षकांनाही कृतज्ञता सन्मान देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत 35 विद्यार्थी आणि इयत्ता 5 वी व 8 वी च्या शिष्यवृ्त्ती परीक्षेमध्ये 10 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेल्या नमुंमपा राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्र. 55 आंबेडकर नगर या शाळेस विशेष प्राविण्यप्राप्त शाळा म्हणून गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत 16 विद्यार्थी आणि इयत्ता 5 वी व 8 वी च्या शिष्यवृ्त्ती परीक्षेमध्ये 14 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेल्या नमुंमपा प्राथमिक शाळा क्र. 42, घणसोली यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. त्यासोबतच माध्यमिक शालांत परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त नमुंमपा माध्यमिक शाळा क्र. 104 आंबेडकर नगर व नमुंमपा माध्यमिक शाळा क्र. 105 घणसोली यांनाही सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आली.