नवी मुंबई

नवी मुंबई शहर स्वच्छतेत आता विविध स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ चे ‘नागरिकांना प्राधान्य (People First)’ हे बोधवाक्य जाहीर करण्यात आले असून नवी मुंबई महानगरपालिकेने त्याआधी 15 ऑगस्ट पासूनच ‘माझं शहर – माझा सहभाग’ हे घोषवाक्य नजरेसमोर ठेवून स्वच्छतेचे पुढचे पाऊल टाकण्यास सुरूवात केलेली आहे. सर्वेक्षण हा स्वच्छतेच्या तपासणीचा एक महत्वाचा भाग असला तरी स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने नागरिकांकडून स्वच्छताविषयक विविध गोष्टींचे पालन केले जावे व स्वच्छता ही अंगभूत सवयाची गोष्ट व्हावी हा महानगरपालिकेचा प्रयत्न असल्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले. विष्णुदास भावे नाट्यगृह येथे विविध स्वयंसेवी संस्था, महिला मंडळे, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या प्रतिनिधींशी पॉवर पॉईट प्रेझेन्टेशनव्दारे सादरीकरण करीत स्वच्छता कार्यात विविध संस्थांच्या सहभागाविषयी आयुक्तांनी थेट संवाद साधला.

स्वच्छतेमधील कामगिरी उंचाविण्यासाठी नागरिकांचा संपूर्ण सहभाग अत्यंत महत्वाचा असून सध्या ब-याच स्वयंसेवी संस्था स्वच्छताविषयक विविध बाबींमध्ये महानगरपालिकेसोबत सक्रीय आहेत अशी माहिती देतानाच आयुक्तांनी त्यामध्ये वाढ व्हावी यादृष्टीने आजचा संवाद महत्वाचा असल्याचे स्पष्ट केले.

स्वच्छता सवयींमध्ये बदल करताना आपण आज नेमके कोणत्या पातळीवर आहोत याचा विचार करण्याची गरज असून आपल्याला कोणते लक्ष्य साध्य करायचे आहे हे निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले.

‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ ला सामोरे जाताना रिसायकलींग मार्ट, आत्मनिर्भर सोसायटी, लोकसहभागातून सार्वजनिक जागांचे सुशोभिकरण, रस्ते दत्तक योजना, उद्यानांच्या कडेला पेट कॉर्नर निर्मिती, सर्व वॉर्डमध्ये स्वच्छता कॉर्नर स्वरूपातील सेल्फी पॉईंट्स निर्मिती, प्लॉग रन, झिरो वेस्ट वॉर्ड, स्वच्छ चॅम्पियन असे नानाविध नाविन्यपूर्ण उपक्रम महानगरपालिकेने हाती घेतले असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग मिळावा याकरिता स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन काम करावे असे आवाहन आयुक्तांनी उपस्थित संस्था प्रतिनिधींना केली.

नंबर वनची क्षमता असणारे आपले नवी मुंबई शहर असून आपल्या शहराकडून राज्य व राष्ट्रीय पातळीवर मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जातात. त्यामुळे स्वच्छतेबाबत आपण करू तितके काम कमीच असून स्वच्छतेबाबतच्या अनेक लहान लहान गोष्टी आपल्याला उद्दिष्टपूर्तीकडे नेऊ शकतात असा विश्वास व्यक्त करीत आयुक्तांनी स्वयंस्फुर्तीने काम करतील अशा संस्थांचा या स्वच्छता कार्यात सहभाग गरजेचा असल्याचे सांगितले. याकरिता विविध क्षेत्रात कामे करणा-या स्वयंसेवी संस्थांकडून आपापल्या क्षेत्रात सहभाग, निरीक्षण, प्रचार व प्रशिक्षण या 4 गोष्टींच्या अनुषंगाने काम करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महानगरपालिका आपल्या परीने स्वच्छता कार्य करीत आहे, त्याला स्वयंसेवी संस्थांची जोड मिळाली तर शहरात व्यापक स्वच्छता चळवळ उभी राहील आणि सर्वेक्षणाच्या पलिकडे जाऊन आपण नंबर वनचे शहर म्हणून सिध्द होऊ असा विश्वास व्यक्त करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी लोकसहभाग वाढीकरिता एकत्र मिळून काम करूया असे आवाहन उपस्थित संस्था प्रतिनिधींना केले.

यावेळी विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या स्वयंसेवी संस्था, महिला मंडळे, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघटना प्रतिनिधींनी आयुक्तांशी थेट संवाद साधत विविध सूचना केल्या तसेच स्वच्छताविषयक उपक्रमात पुढाकार घेत काम करण्याची ग्वाही दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button