घणसोलीतील कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्याच्या पार्श्वभूमीवर शाळेतील इतर विद्यार्थी व कुटुंबियांचे कोव्हीड टेस्टींग
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व कनिष्ठ विद्यालयातील एका विद्यार्थ्याचे पालक कतार येथून प्रवास करून आल्यानंतर सदर पालक व त्यांच्या कुटुंबियांची कोव्हीड टेस्ट केली असता त्या पालकाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली, मात्र त्याच्या पाल्याचा कोव्हीड टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. सदर पालकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला असल्याने त्यांच्या पाल्यास नेमकी कुठून लागण झाली याबाबत सर्व शक्यता पडताळून घेण्यात येत असून सदर पाल्याचे सॅम्पल्स जिनोम सिक्वेंसिंग करीता पाठविण्यात आलेले आहेत.
हा विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत होता त्या शाळेतील 800 हून अधिक विद्यार्थ्यांची कोव्हीड टेस्ट करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 16 विद्यार्थ्यांचा कोव्हीड टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला असून त्या सर्व कोव्हीड लक्षणे विरहित मुलांना वाशी येथील महानगरपालिकेच्या सिडको कोव्हीड सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले आहे. या पॉझिटिव्ह आलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या कुटूंबातील सदस्यांची तसेच त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचीही कोव्हीड टेस्टींग करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे उर्वरित मुलांची व त्यांच्या कुटुंबियांची घरी जाऊन टेस्टींग करण्यात येत आहे.
मागील दोन दिवसांप्रमाणेच आजही त्या शाळेतील विद्यार्थ्याची कोव्हीड टेस्टींग करण्यात आली असून कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनेची अंमलबजावणी करीत शाळा व शाळेभोवतालच्या परिसराचे निर्जुंतकीकरण करण्यात आलेले आहे. महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार सदर शाळा 18 ते 26 डिसेंबर 2021 या 7 दिवसांच्या काळात बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले असून 27 डिसेंबर रोजी शाळा सुरू करण्यापूर्वी कोव्हीड प्रतिबंधात्मक उपायोजनांची खातरजमा करण्याचे आदेशही संस्थेला देण्यात आलेले आहेत.
या पार्श्वभूमीवर सर्व शाळांमध्ये कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत संपूर्ण दक्षता घ्यावी असे आदेश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देशानुसार शिक्षण विभागाने जारी केले आहेत.