नमुंमपा शाळांतील चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा आता बायजू शैक्षणिक ॲपव्दारे शैक्षणिक विकास
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
पारंपारिक शिक्षण पध्दतीला न डावलता त्यामध्ये आजच्या माहिती तंत्रज्ञान युगाला साजेशा अत्याधुनिक शिक्षण प्रणालीचा अंतर्भाव व उपयोग करून विद्यार्थ्यांमधील जिज्ञासू वृत्ती वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी लायन्स क्लब ऑफ वाशी गोल्ड आणि स्माईल्स फाऊंडेशन यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेऊन महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना बायजू शैक्षणिक ॲप 3 वर्ष कालावधीकरिता उपलब्ध करून दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
लायन्स क्लब ऑफ वाशी गोल्ड व स्माईल्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नमुंमपा शाळांतील इ. 4 थी ते 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना बायजू शैक्षणिक ॲप 3 वर्षांकरिता उपलब्ध करून देण्यात येत आहे. महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित बायजू शैक्षणिक ॲपच्या शिक्षक प्रशिक्षणाप्रसंगी झालेल्या करार वितरण कार्यक्रमात महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, शिक्षण विभागाचे उप आयुक्त श्री. जयदिप पवार, लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री. एल.जे.टावरी, सचिव श्रीम. सुधाराणी जैन, अध्यक्ष श्रीम. अनुराधा जैन, सदस्य श्रीम. वैशाली साळवी व श्रीम. आशा पटेल तसेच स्माईल्स फाऊंडेशनचे मुख्य समन्वयक श्री. धिरज आहुजा, अध्यक्ष श्रीम. उमा आहुजा, सचिव श्रीम. शालिनी विधानी, सदस्य श्रीम. अरूणा आनंद व श्रीम. शेफाली नायर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी व त्यांच्या गुणांमध्ये वृध्दी व्हावी यादृष्टीने दृकश्राव्य माध्यमातून शिक्षणाच्या संकल्पना स्पष्ट करणारे बायजू शैक्षणिक ॲप अत्यंत उपयोगी ठरणार असून पहिल्या टप्प्यात महापालिका शाळांतील 8 वी ते 10 वी च्या 9632 विद्यार्थ्यांना हे ॲप उपलब्ध करून दिले जात आहे. एकूण 40 हजार विद्यार्थ्यांना हे ॲप उपलब्ध करून देण्याचा करार झाला असून याव्दारे शालेय अभ्यासक्रमातील विविध विषयांच्या संकल्पनांची स्पष्टता (Concept Clearity) होण्यासाठी याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे मुलांमध्ये स्वयंअध्ययनाची सवय विकसित होऊन सोप्या पध्दतीने विषय आकलन होऊन अभ्यासाची आवड निर्माण होणार आहे.
याप्रसंगी आयुक्तांनी आपल्या मनोगतात शिक्षण पध्दतीत कालानुरूप गुणवत्तापूर्ण बदल झाले असून दृकश्राव्य पध्दतीने शिक्षण घेण्याची पध्दत विकसित होत आहे. यामध्ये मुलांची निरीक्षण शक्ती व त्यामधून जिज्ञासा वाढीवर भर दिला जात असून दोन्ही पध्दतींच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास केला जात असल्याचे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेने यादृष्टीने नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन ठेवला असून विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तकाच्या पलीकडे जाऊन विज्ञान, कला, क्रीडा अशा विविध विषयांची माहिती व्हावी व त्याबद्दल आवड निर्माण व्हावी यादृष्टीने द हिंदू वर्तमानपत्राच्या शालेय मुलांसाठीचा विशेषांक उपलब्ध करून देणे त्याचप्रमाणे त्यांच्या शैक्षणिक विकासात खंड पडू नये यादृष्टीने ऑनलाईन शिक्षणाच्या नेटपॅक करिता अनुदान उपलब्ध करून देणे अशा विविध गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामध्ये लायन्स क्लब व स्माईल्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने बायजू शैक्षणिक ॲप सारख्या महत्वपूर्ण सुविधेची भर घातली जात असून यामधून महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीचा नवा मार्ग खुला होत असल्याचा आनंद आयुक्तांनी व्यक्त केला. या शैक्षणिक ॲपचे महत्व ओळखून हे ॲप प्रत्येक मुलापर्यंत पोहचेल व त्याचा उपयोग केला जाईल याकडे सर्व शिक्षकांनी काटेकोर लक्ष द्यावे आणि शिक्षण विभागाने त्याचा नियमित आढावा घ्यावा असे निर्देश आयुक्तांनी याप्रसंगी दिले.
लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय संस्था नेहमीच समाजातील गरजू घटकांसाठी मदतीचा हात पुढे करीत असून नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना साधारणत: 14.50 कोटी रक्कमेचे बायजू शैक्षणिक ॲप उपलब्ध करून देण्याची संधी आम्हांला मिळाली याबद्दल लायन्स क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर श्री. एल.जे.टावरी यांनी समाधान व्यक्त केले.
बायजू शैक्षणिक ॲपची प्रणाली राबविण्यासाठी महानगरपालिका शिक्षकांसाठी तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले असून या प्रशिक्षणाचा उपयोग प्रत्येक विद्यार्थ्याला होईल याची काळजी प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी घ्यावी असे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सूचित केले.