स्वच्छ सर्वेक्षणात 17 डिसेंबरला रंगणार नामांकित कवींचे ‘स्वच्छ कविसंमेलन’
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ मध्ये 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या देशातील मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबईस देशातील प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त झालेला असून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ ला समर्थपणे सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई सज्ज झालेली आहे.
या अनुषंगाने लोकसहभाग वाढीवर भर दिला जात असून त्यादृष्टीने विविध स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे स्वच्छताविषयक जनजागृती व्हावी यादृष्टीने नानाविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
अशाच प्रकारे कवितेच्या माध्यमातून स्वच्छताविषयक जाणीव जागृती व्हावी यादृष्टीने नामवंत कवींच्या सहभागाने रंगणारे ‘स्वच्छ कविसंमेलन’ आयोजित करण्यात आलेले आहे.
शुक्रवार, दि. 17 डिसेंबर 2021 रोजी सायं. 7 वा. विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या या ‘स्वच्छ कविसंमेलना’ मध्ये नामांकित कवी श्री. रामदास फुटाणे, श्री. अशोक नायगांवकर, प्रा. अशोक बागवे, श्री. साहेबराव ठाणगे, प्रा. प्रशांत मोरे हे मराठी भाषेतील तसेच श्री. संजय व्दिवेदी व श्रीम. कविता राजपूत हे हिंदी भाषेतील कविता सादर करणार आहेत. या नामवंत कवींच्या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन सुप्रसिध्द कवी श्री. अरूण म्हात्रे करणार आहेत.
कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीचे संपूर्ण पालन करून विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये हे कविसंमेलन संपन्न होत असून याप्रसंगी साहित्य रसिकांनी मास्कचा वापर करून तसेच सुरक्षित अंतर राखून उपस्थिती दर्शवावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.