“हर घर दस्तक अभियान” अंतर्गत 36 हजाराहून अधिक नागरिकांचे घरापर्यंत पोहचून लसीकरण
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका सतर्क झाली असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी टेस्टींगमध्ये वाढ तसेच नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याची कार्यवाही गतीमानतेने पूर्ण करण्याकडे अधिक प्रभावी रितीने काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूपासून बचावासाठी मास्क हेच सर्वात प्रभावी अस्त्र आहे हे लक्षात घेत ‘मास्क व लसीकरण नाही तर प्रवेश नाही’ ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे.
सद्यस्थितीत 75 टक्के नागरिकांनी कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेतले असून उर्वरित नागरिकांपर्यंत जलदरित्या पोहचून त्यांना संपूर्ण लस संरक्षित करण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेने 11 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत “हर घर दस्तक अभियान” प्रभावीपणे राबवित अभियान कालावधीत 26,948 नागरिकांचे लसीकरण केलेले आहे. यामध्ये प्रत्येक नागरी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात घरोघरी जाऊन ज्यांचे लसीकरण राहिले आहे त्यांना घराजवळच लसीकरण कऱण्यात आले. या मोहिमेचे महत्व लक्षात घेत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी हे अभियान नंतरच्या कालावधीतही सुरु ठेवावे असे निर्देश आरोग्य विभागाला दिलेले असून घरापर्यंत पोहचून लसीकरण करण्याची कार्यवाही नियमित सुरु ठेवण्यात आलेली आहे. त्यानुसार नागरी आरोग्य केंद्रनिहाय तयार केलेल्या पथकांच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून 1 ते 06 डिसेंबर या कालावधीत 9346 नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. अशाप्रकारे ‘हर घर दस्तक’ अभियानाच्या माध्यमातून 36 हजार 294 नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.
ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर कोव्हीड टेस्टींगचे दैनंदिन 7 हजारापर्यंत असलेले प्रमाण जराही कमी न करता वाढविण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे लवकरात लवकर जास्तीत जास्त नागरिकांना लस संरक्षित करण्यावर भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने हर घर दस्तक अभियानाव्दारे केल्या जाणा-या लसीकरणाला चांगला प्रतिसाद लाभलेला आहे.
आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार हर घर दस्तक अभियानाप्रमाणेच मार्केटसारख्या वर्दळीच्या ठिकाणी रुग्णवाहिका उभी करून ‘लसीकरण आपल्या दारी’ ही मोहिमही अधिक प्रभावी करण्यात आली असून 1 डिसेंबर पासून सहा दिवसात 1579 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
याशिवाय नेरुळ, वाशी व घणसोली या 3 रेल्वे स्टेशनप्रमाणेच 1 डिसेंबरपासून कोपरखैरणे व ऐरोली या दोन रेल्वे स्टेशनवरही कोव्हीड लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली असून त्याठिकाणी आत्तापर्यंत 7 हजार 840 नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.
कोव्हीडच्या पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करणारे नवी मुंबई हे पहिेले शहर असून सद्यस्थितीत 8 लक्ष 30 हजार 172 नागरिकांनी म्हणजेच 75 टक्के नागरिकांनी कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेतलेला आहे. 100 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस लवकरात लवकर पूर्ण व्हावेत याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग अधिक सक्रीय झाला आहे.
तरी नवी मुंबईकर नागरिकांनी ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन मास्क मुळेच कोव्हीड पासून बचाव होऊ शकतो हे लक्षात घेऊन मास्कचा नियमित वापर करावा तसेच सुरक्षित अंतर, हात स्वच्छ राखणे, चेह-याला हाताने स्पर्श न करणे अशा कोव्हीड प्रतिबंधात्मक वर्तनाची (covid appropriate behavior)अंगिकार दैनंदिन सवय लावून घ्यावी असे आवाहन करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी परदेशातून आलेल्या नागरिकांनी वा त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या विषयीची माहिती 022-27567460 या नमुंमपा कोव्हीड वॉर रुमच्या क्रमांकावर त्वरित द्यावी असे आवाहन केले आहे.