नवी मुंबई

जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून इटीसी केंद्रामार्फत महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

एकाच छताखाली विविध प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राच्या वतीने दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून संपूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे. समाजामध्ये दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करणे तसेच दिव्यांग मुलांना प्रोत्साहित करणे या हेतूने संपूर्ण महिनाभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या अनुषंगाने 3 डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनी नमुंमपा इटीसी केंद्रामध्ये संपन्न झालेल्या विशेष कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे व श्रीमती सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील तसेच इटीसी केंद्र संचालक डॉ, वर्षा भगत आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी etcnmmc.org या इटीसी केंद्राच्या  विशेष संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच नमुंमपा इटीसी केंद्राव्दारे राबविण्यात येणा-या विविध योजनांची एकत्रित व सविस्तर माहिती उपलब्ध व्हावी याकरिता विशेष माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले

दिव्यांगत्व कायदा 2016 नुसार नव्याने ज्या 21 दिव्यांग प्रवर्गांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याची माहिती सर्व नागरिकांना व्हावी यादृष्टीने या सर्व दिव्यांग प्रवर्गाचे प्रतिकात्मक साहित्य निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याचेही अनावरण या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आले. तसेच नमुंमपा इटीसी केंद्रातील दिव्यांग मुलांच्या अंगभूत गुणांना वाव देण्याकरिता या मुलांच्या चित्र प्रदर्शनाचेही अनावरण करण्यात आले.

या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे यांनी इटीसी केंद्राच्या कार्याबाबत समाधान व्यक्त करीत केंद्रामार्फत दिव्यांग मुलांच्या समवेत त्यांच्या पालकांसाठीही नवनवीन उपक्रम राबवावेत अशी सूचना केली. तसेच अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी दिव्यांग मुलांमधील अक्षमतांपेक्षा त्यांच्या कौशल्यावर भर देत त्यांचा विकास करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी इटीसी केंद्रातील मुलांनी काढलेल्या चित्रप्रदर्शनाचेही कौतुक केले.

यावेळी इटीसी संचालक डॉ. वर्षा भगत यांनी प्रास्ताविकामध्ये योजना अर्जांकरिता बनवण्यात आलेल्या etcnmmc.org या संकेत स्थळामुळे दिव्यांगांकरिता असलेल्या योजनांचे अर्ज दिव्यांग व्यक्तींना घरबसल्या दाखल करता येऊन त्याचा विनात्रास लाभ घेता येईल अशी माहिती दिली.

 1 ते 31 डिसेंबर या संपूर्ण महिन्याच्या कालावधीत तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयांवरील कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग मुलांकरिता करिअर मार्गदर्शन करणे, कोविड संक्रमणात पाल्यांबाबत घ्यावयाची काळजी याबाबत समुपदेशन करणे, दिव्यांग मुले व व्यक्ती यांच्यामध्ये क्रीडा विषयक प्रोत्साहन व मार्गदर्शन करणे, दिव्यांग मुलांकरिता पोषक आहाराबाबत समुपदेशन करणे, बहुविकलांग मुलांकरिता व्यवसाय प्रशिक्षण संबंधी पालकांसाठी प्रशिक्षँ, दिव्यांग मुलांकरिता कला संबंधित प्रोत्साहनपर कार्यशाळा अशा विषयांचा समावेश आहे

दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करण्याकरिता नमुंमपा क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी फ्लेक्स बॅनर्स लावण्यात आले असून सर्व विभाग कार्यालयांच्या आवारामध्ये दिव्यांगत्व जनजागृती व नमुंमपा इटीसी  केंद्रामार्फत दिव्यांग मुले व प्रौढांना देण्यात येणा-या विविध योजनांच्या माहितीचे जनजागृतीपर बॅनर्स लावण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button