मालमत्ता कर अभय योजनेला ३१ जानेवारी २०२२ पर्यंत अंतिम मुदतवाढ
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकर नागरिकांना दिलासा मिळावा यादृष्टीने ०१ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मालमत्ता कर अभय योजना जाहीर करण्यात आली होती. सदर योजनेची मुदत वाढविणेबाबत विविध माध्यमातून करण्यात आलेल्या विनंतीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी मालमत्ता कर अभय योजनेस २ महिने म्हणजेच दि. ३१ जानेवारी २०२२ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केलेला आहे.
मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असून दि.०१ ऑक्टोबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ या दोन महिन्यांच्या कालावधीकरीता थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर ७५% पर्यंत सूट देणारी थकबाकीदारांसाठी लाभदायी अभय योजना जाहीर करण्यात आली होती. या अभय योजनेस अजून थोडा कालावधी वाढवून मिळावा अशा प्रकारच्या विनंती / सूचना विविध माध्यमांतून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्याकडे करण्यात येत होत्या. त्यास अनुसरून ही २ महिन्यांची म्हणजेच ३१ जानेवारी २०२२ पर्यंत अंतिम मुदतवाढ जाहीर करण्यात आलेली आहे.
आता ३१ जानेवारी २०२२ पर्यंत थकबाकीदार नागरिकांनी मालमत्ता कराची संपूर्ण थकित रक्कम अधिक २५% दंडात्मक रक्कम भरणा केल्यास त्यांच्या दंडात्मक रक्कमेवर ७५% सूट मिळणार आहे. तरी नागरिकांनी या या अंतिम मुदतवाढीच्या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन ३१ जानेवारी पर्यंत न थांबता आजच नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटला भेट देऊन अभय योजनेचा लाभ घ्यावा व शहर विकासास हातभार लावावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.