नवी मुंबई

मतदार नोंदणी जनजागृतीपर पथनाट्यांना नवी मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

राज्य निवडणूक आयोगामार्फत मतदार नोंदणीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत घोषित करण्यात आला असून दि. 5 जानेवारी रोजी या कार्यक्रमानंतर घोषीत करण्यात येणा-या निवडणूक याद्या या नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकीत मतदान करण्यासाठी मतदार नोंदणीची ही अखेरची सुवर्ण संधी असून याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी बॅनर्स, होर्डींग, जाहीराती, विविध सोशल मिडीया यांचा प्रभावी वापर करण्यात येत आहे.

यामध्ये महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार थेट नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी मनोरंजनातून प्रबोधन करणा-या पथनाट्यासारख्या लोकप्रिय माध्यमाचाही नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक विभागामार्फत उपयोग केला जात असून 15 नोव्हेंबरपासून महापालिका क्षेत्रातील आठही विभागात मोक्याच्या व वर्दळीच्या ठिकाणी मतदार नोंदणी जनजागृतीपर पथनाट्ये सादर केली जात आहेत. आरंभ क्रिएशन या कला संस्थेचे कलाकार दररोज 5 ते 6 वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्याव्दारे मतदार नोंदणी विषयक जनजागृती करीत आहेत.

आत्तापर्यंत झालेल्या 40 हून अधिक पथनाट्य प्रयोगांना उपस्थित नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून पथनाट्यप्रयोग संपल्यानंतर अनेक जण या कलावंतांसोबत सेल्फी देखील काढतात. 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नागरिक मतदार नोंदणीस पात्र असल्याने महाविद्यालयांमध्येही पथनाट्यांचे प्रयोग केले जात आहेत. या प्रयोगांमध्ये तंत्रस्नेही युवा पिढीची माहिती तत्रज्ञानाविषयक आवड लक्षात घेऊन www.nvsp.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन मतदार नोंदणी करून घेण्यावर भर देण्यात येत आहे. नवीन मतदार नोंदणीप्रमाणेच मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट असल्याबाबत खात्री करून घेण्याविषयी देखील नागरिकांना जागरूक करण्यात येत आहे. केवळ छायाचित्र मतदार ओळखपत्र आहे म्हणून मतदान करता येईल असे नाही तर मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट असणे आवश्यक असल्याचे नागरिकांच्या लक्षात आणून देण्यात येत आहे.

पथनाट्यासारख्या जनमानसात लोकप्रिय असणा-या कला माध्यमातून विविध समाज घटकांपर्यंत मतदार नोंदणीचा संदेश प्रसारित केला जात असून यामधील दोन प्रयोग तृतीय पंथीय नागरिकांच्या वसाहतीतही आयोजित करण्यात आले. त्याचप्रमाणे दिव्यांगांनाही नोंदणी करून घेण्याबाबत प्रोत्साहित करण्यात येत आहे. सुट्टीच्या दिवशी मॉलमध्ये येणारी नागरिकांची मोठी संख्या लक्षात घेता मॉलच्या ठिकाणीही सादर होणा-या पथनाट्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे

आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीत मतदान करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत असणा-या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2022 चा लाभ घेऊन 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकाने आपले नाव नोंदवावे व नाव नोंदविलेले असणा-या नागरिकांना आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button