लोकसहभागातून स्वच्छतेवर भर देत सोसायटी, शाळा, हॉटेल, हॉस्पिटल, मार्केट, शासकीय कार्यालय यांची ‘स्वच्छता स्पर्धा’ जाहीर
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ मध्ये 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये देशातील प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबईस प्राप्त झालेला असून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका अधिक उत्साहाने सहभागी झालेली आहे.
नागरिकांच्या सक्रीय सहभागामुळे स्वच्छता मानांकनात नवी मुंबई नेहमी आघाडीवर राहिलेली असून स्वच्छताविषयक विविध उपक्रम अधिकाधिक लोकाभिमुख होण्याकरिता तसेच स्वच्छताविषयक वर्तणूकीमध्ये बदल होण्याच्या दृष्टीने माहिती व शिक्षण प्रसार आणि जनजागृती अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांना कचरा वर्गीकरण व प्रक्रिया तसेच इतर स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन देणे व या कार्यवाहीत सातत्य ठेवून रहिवाशांच्या सवयीत बदल घडविण्याच्या दृष्टीने तसेच सध्याच्या कोविड-19 या साथरोगाच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्याच्या दृष्टीने नागरिकांकडून वारंवार हात धुणे, मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करणे अशा कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करणे या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई शहरातील ‘हॉटेल्स, शाळा (खाजगी व नमुंमपा), गृहनिर्माण संस्था / RWA, मार्केट असोसिएशन, शासकीय कार्यालये व हॉस्पिटल या प्रमुख सहा गटांमध्ये ‘स्वच्छता स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे.
या स्पर्धेचे गुणांकन करण्याकरिता निकष निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने कचरा वर्गीकरण (Source Segregation), कच-यावर कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करणे, शौचालय व्यवस्था, स्वच्छता विषयक पायाभूत सुविधा तसेच कोव्हीड-19 या आजाराचा प्रसार रोखण्याकरीता करण्यात येत असलेल्या नियमांचे पालन अशा महत्वाच्या बाबींवर भर देण्यात आलेला आहे.
या 6 गटांमध्ये आयोजित स्वच्छता स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणा-या संस्थांना दिनांक 29 नोव्हेंबर ते 03 डिसेंबर, 2021 या कालावधीत संबंधित विभाग कार्यालयात अर्ज करता येणार आहेत. या स्पर्धेचे प्रत्यक्ष स्थळ परीक्षण व गुणांकन 03 डिसेंबर ते 20 डिसेंबर, 2021 या कालावधीत करण्यात येणार आहे.
या स्वच्छता स्पर्धेमध्ये नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग अपेक्षित असून जास्तीत जास्त नागरिकांना प्रोत्साहन मिळावे यादृष्टीने संपूर्ण महापालिका स्तराप्रमाणेच आठही विभाग स्तरावर स्वतंत्र पारितोषिके दिली जाणार आहेत.
विभाग स्तरावर निवड करण्यात आलेल्या प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ गृहनिर्माण संस्थांना अनुक्रमे रु. 21 हजार, 15 हजार व 11 हजार रक्कमेची रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह प्रदान केली जाणार आहेत.
स्वच्छ शाळा स्पर्धेच्या महापालिका शाळा व खाजगी शाळा अशा दोन्ही गटांतील प्रथम व व्दितीय क्रमांकाच्या विजेत्या शाळांना अनुक्रमे रु.15 हजार व रु.11 हजार रक्कमेची रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह प्रदान करण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे संपूर्ण महापालिका स्तरावरील विजेत्या प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ गृहनिर्माण संस्थांना अनुक्रमे रु. 51 हजार, रु. 41 हजार व रु. 31 हजार रक्कमेची रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र तसेच स्वच्छ शाळा स्पर्धेच्या (खाजगी व नमुंमपा) दोन्ही गटांतील प्रथम व व्दितीय क्रमांकाने विजेत्या शाळांना अनुक्रमे रु. 25 हजार व रु. 21 हजार रक्कमेची रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह प्रदान करण्यात येणार आहेत.
तसेच ‘स्वच्छ मार्केट’ करीता प्रथम व व्दितीय क्रमांकाने विजेत्या मार्केट्सना अनुक्रमे रु.25 हजार व रु.21 हजार रक्कमेची रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय स्वच्छता स्पर्धेतील स्वच्छ हॉटेल, स्वच्छ शासकीय कार्यालय व स्वच्छ हॉस्पिटल या 3 विभागांतील प्रथम व व्दितीय क्रमांकाच्या विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संस्था व नागरिकांनी या 6 गटांतील स्वच्छता स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ व ‘स्वच्छ नवी मुंबई मिशन’ यशस्वीपणे राबविण्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा आणि ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे आपले उद्दिष्ट साकारण्यासाठी स्वच्छता ही आपली दैनंदिन सवय करून घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.