नवी मुंबई

कोव्हीड कालावधीमध्ये अनाथ झालेल्या बालकांसाठीच्या कल्याणकारी योजना अर्थसहाय्याचे वितरण

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

कोव्हीड कालावधीमध्ये कोव्हीडमुळे दोन पालक अथवा एक पालक दिवंगत झालेल्या मुलांच्या संगोपनाकरीता अर्थसहाय्य देणेबाबतची कल्याणकारी योजना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असून त्यामधील पात्र 55 लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण नवी मुंबई न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीम. तृप्ती देशमुख – नाईक आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. वाशी तालुका विधी सेवा समिती आणि नवी मुंबई वकिल बार असोशिएशनमार्फत डॉ.डी.वाय. पाटील विधी महाविदयालयात आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमामध्ये बालदिनाचे औचित्य साधून बालकांसाठी असलेल्या या कल्याणकारी योजनेचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी नवी मुंबई न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीम. तृप्ती देशमुख – नाईक, महापालिका अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, समाज विकास विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संध्या अंबादे, डी.वाय.पाटील विधी महाविदयालयाचे प्राचार्य श्री. अजय पाटील, महापालिकेचे विधी अधिकारी श्री. अभय जाधव, नवी मुंबई बार असोसिएशनचे कार्यकारी सदस्य ॲड. अक्षय अशोक काशिद व असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

कोरोना कालावधीत ज्या बालकांनी आपले एक अथवा दोन्ही पालक गमावलेले आहेत त्यांच्या संगोपनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची ही योजना अत्यंत चांगली असून आज या योजनेचे वितरण करताना अतिशय समाधान लाभत असल्याचे मत याप्रसंगी बोलताना नवी मुंबई न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीम. तृप्ती देशमुख – नाईक यांनी व्यक्त केले.

नवी मुंबई महानगरपालिकेने या योजनांच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला असून त्या मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी हे अर्थसहाय्य अतिशय मोलाचे ठरेल असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी सांगितले. प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी कोरोना काळात निराधार झालेल्या मुलांसाठी व महिलांसाठी महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती दिली.  

कोव्हीडमुळे दोन्ही पालक / एक पालक गमावलेल्या मुलांकरिता कल्याणकारी योजना –

(i)कोव्हीडमुळे दो्न्ही पालक किंवा एक पालक गमावलेल्या मुलांच्या संगोपनाकरिता अर्थसहाय्य.

दोन्ही पालक गमावलेल्या बालकास अर्थसहाय्यएक  पालक  गमावलेल्या बालकास अर्थसहाय्य
वय वर्ष 0 ते 5 – रू. 2000 प्रतिमहावय वर्ष 0 ते 5 –   रू. 1000 प्रतिमहा
वय वर्ष 6 ते 10 – रू. 4000 प्रतिमहावय वर्ष 6 ते 10 –  रू. 2000 प्रतिमहा
वय वर्ष 11 ते 18 – रू. 6000 प्रतिमहावय वर्ष 11 ते 18 – रू. 3000 प्रतिमहा

वरील टप्प्यांनुसार ते बालक अठरा वर्ष पूर्ण करेपर्यंत दरमहा मिळणा-या अर्थसहाय्यास पात्र राहील.

(ii)अनाथ मुलांच्या शिक्षणाकरिता महानगरपालिकेमार्फत आधीपासूनच स्वतंत्र योजना सुरू असल्याने कोव्हीडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या 18 ते 21 वयोगटातील बेरोजगार युवक / युवतींकरिता शैक्षणिक बाबी वगळून इतर बाबींच्या खर्चासाठी अर्थसहाय्य – रू. 50 हजार प्रतिवर्ष.

कोव्हीडमुळे पतीचे निधन झालेल्या महिलांकरिता कल्याणकारी योजना –

(i)कोव्हीडमुळे पतीचे निधन झालेल्या महिलेस एकरक्कमी अर्थसहाय्य देणे – रू. 1.50 लक्ष अर्थसहाय्य.

त्याचप्रमाणे –

(ii)कोव्हीडमुळे पतीचे निधन झालेल्या महिलेस स्वयंरोजगारासाठी साहित्य संच उपलब्ध करून घेणेकरिता अर्थसहाय्य करणे – स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलेस संपूर्ण हयातीत एकदाच रू. 1 लक्ष रक्कमेपर्यंतचे अर्थसहाय्य ( दोन टप्प्यात ).

कोव्हीडमुळे पतीचे निधन झालेली महिला या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र राहील.

या योजनांची माहिती देऊन उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी निसर्ग व पर्यावरण संवर्धानासाठी माझी वसुंधरा अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना वाशी तालुका विधी सेवा समिती आणि नवी मुंबई वकिल बार असोशिएशन मार्फत या कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या योजनांचे अर्थसहाय्य वितरण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button