सिडको आणि अक्षर बिल्डर विरोधात रहिवाशांचे धरणे आंदोलन : सिडको आणि अक्षरची सुरू असलेली कामेही बंद पाडण्याचा इशारा !
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
उरण (दिनेश पवार) उरण तालुक्यातील बोकडवीरा द्रोणागिरी नोड मधील १५ माळ्याच्या अक्षर इस्टोनीयामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. ३५० फ्लाटधारकांना पाणीच मिळत नसल्याने पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची पाळी आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी रविवारी (१५) सिडको आणि अक्षर बिल्डर विरोधात धरणे आंदोलन करुन संताप व्यक्त केला. वेळ प्रसंगी सिडको आणि अक्षरची ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत त्या ठिकाणी आंदोलने करून तेथील काम बंद पाडण्याचा इशाराही अक्षर इस्टोनीया रहिवासी संघाने दिला आहे.
बोकडवीरा- नवीन शेवा या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील द्रोणागिरी नोड मधील सिडकोच्या सेक्टर ४७ मधील प्लाट नं.४१ मध्ये अक्षर बिल्डरने १५ माळ्याचे टॉवर उभारले आहे. अत्याधुनिक सोयी – सुविधांयुक्त उभारण्यात आलेल्या या टॉवरमध्ये ३५० फ्लॅट असुन सुमारे १५०० रहिवासी दिड वर्षांपासून वास्तव्यास आले आहेत. या चार टॉवरमध्ये प्रत्येकी ९० असे एकूण ३६० फ्लॅट आहेत. या ३६० फ्लाटधारकांसाठी फक्त एकच कनेक्शन बिल्डरने जोडले आहे. या टॉवरमधील फ्लाटधारकांना सिडकोकडून हेटवणे धरणातुन पाणी पुरवठा केला जात असुन दर दिवशी १ लाख ६० युनिट पाण्याचा कोटा दिलेला आहे. मात्र मागील वर्षभरापासून फक्त कोट्यापेक्षाही निम्मेच पाणी मिळत आहे. यामुळे रहिवाशांना मागील वर्षभरापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दिलेल्या कोट्याप्रमाणे आणि दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी अक्षर इस्टोनीया रहिवासी संघाने अनेकदा सिडकोच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र यातुन काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी रहिवासी संघावर पैसे मोजून रहिवाशांना टॅकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. या टॅकरने पाणी पुरवठा करण्यासाठी रहिवाशांना दरमहा ६० हजार रुपये अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. शिवाय अपुरा पाणीपुरवठा होत असतानाही रहिवाशांकडून पाणी बिलापोटी नियमित दरमहा ५९ हजाराचे सिडकोकडून वसुल करण्यात येत असल्याची माहिती अक्षर इस्टोनीया रहिवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
पाणी टंचाईच्या या त्रासाला सिडकोबरोबर अक्षर बिल्डर्सही तितकाच जबाबदार असल्याचा आरोप करीत पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी रविवारी (१५) अक्षर इस्टोनीया रहिवासी संघाच्या नेतृत्वाखाली टॉवर खालीच रहिवाशांनी धरणे आंदोलन सुरू केले होते. या धरणे आंदोलनात अक्षर इस्टोनीया रहिवासी संघाचे प्रशांत भगत, बी.एस.पाटील, गणेश पाटील, नितीन पाटील, शक्ती जोशी आदि पदाधिकाऱ्यांसह शेकडो रहिवासी सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचाही समावेश होता. या आंदोलनानंतरही समस्या दूर झाल्या नाहीत तर सिडको आणि अक्षर बिल्डरची ज्या ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत त्या त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येतील असा इशाराही संतप्त झालेल्या अक्षर इस्टोनीया रहिवासी संघाने दिला आहे.