कॅपजेमिनी कंपनीच्या सीएसआर निधीतून महापालिका ऐरोली रूग्णालयात 25 आयसीयू बेड्सचा अतिदक्षता कक्ष
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
कोव्हीडच्या दुस-या लाटेत सर्वच ठिकाणी जाणवलेली आयसीयू बेड्स आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता लक्षात घेता तसेच काही देशांमध्ये कोव्हीडची चौथी, पाचवी लाट सुरू असल्याचे चित्र नजरेसमोर असताना आपल्या देशात आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविलेल्या संभाव्य तिस-या लाटेत कोणालाही बेड्सची कमतरता भासणार नाही हे सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या नेरूळ व ऐरोली रूग्णालयांमध्ये प्रत्येकी 210 आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्स सुविधा निर्मिती सुरू केलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या या आरोग्य सेवा सक्षमीकरण कामात ‘कॅपजेमिनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी’ ने सकारात्मक प्रतिसाद दर्शवित ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रूग्णालयामध्ये 25 आयसीयू बेड्सच्या अतिदक्षता कक्ष उभारणीकरिता आपला व्यावसायिक सामाजिक दायित्व (CSR) निधी उपलब्ध करून देत पुढाकार घेतला आहे. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज व खाजगी रूग्णालयाला साजेशा आकर्षक स्वरूपात रचना असणा-या या व्हेंटिलेटर्ससह 25 आयसीयू बेड्सच्या अतिदक्षता कक्षाचे लोकार्पण आज महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते कॅपजेमिनी समुहाच्या सीएचआरओ ॲनी लेबल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी महापालिका अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, कॅपजेमिनी कंपनीचे सीईओ अश्विन यार्दी, सीएसआर प्रमुख अनुराग प्रताप, उपाध्यक्ष विजय शानभाग, सीएचआरओ पल्लवी त्यागी, सेंटॉर्स फाऊंडेशनचे प्रमुख संतोष भोसले, ऑसरा हेल्थकेअरच्या संस्थापक डॉ. रसिका बिरेवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कोव्हीडच्या दुस-या लाटेतला अनुभव लक्षात घेऊन संभाव्य तिस-या लाटेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये याकरिता आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्स सुविधा सक्षमीकरणाकडे विशेष लक्ष दिल्याचे सांगत हे करीत असताना कॅपजेमिनी कंपनीने 25 आयसीयू बेड्सचा अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज अतिदक्षता कक्ष उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. खाजगी रूग्णालयातील सुविधेला साजेशी या अतिदक्षता कक्षाची निर्मिती झाली असून येथील वैद्यकीय सुविधाही त्याच दर्जाची असण्याकडे काटेकोर लक्ष दिले जावे असे निर्देश आयुक्तांनी महापालिकेच्या रूग्णालय अधिका-यांना दिले. कॅपजेमिनीने उपलब्ध करून दिलेली ही सुविधा कोव्हीडनंतरच्या काळातही रूग्णसेवेसाठी लाभदायी होणार असल्याचे सांगत आयुक्तांनी कॅपजेमिनीकडून यापुढील काळातही अशाच प्रकारे सहकार्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
कॅपजेमिनीच्या वतीने सीएसआर प्रमुख श्री. अनुराग प्रताप यांनी मनोगत व्यक्त करताना महानगरपालिकेच्या ऐरोली रूग्णालयात उभारण्यात आलेला अतिदक्षता कक्ष हा कंपनीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न असून भविष्यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या लोकोपयोगी उपक्रमांमध्ये कंपनी स्वयंस्फुर्तीने विविध प्रकारचे सहकार्य करेल असे सांगितले.
25 आयसीयू बेड्सच्या या अतिदक्षता कक्षामध्ये कॅपजेमिनी कंपनीने 25 आयसीयू बेड्स, 15 आयसीयू व्हेंटिलेटर्स, 12 बायपॅप मशीन्स, 25 मल्टिपॅरा मॉनिटर, 15 ऑक्सिजन क़ॉन्सन्ट्रेटर, 25 इन्फ्युजन पम्प्स, एबीजी मशीन, रेफ्रिजरेटर आणि इतर आवश्यक साहित्यसामुग्री करिता साधारणत: 8 कोटी रक्कमेचा सीएसआर निधी उपलब्ध करून दिलेला आहे. कोव्हिडच्या संभाव्य तिस-या लाटेच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून महानगरपालिकेच्या आरोग्य सुविधांचे होणारे सक्षमीकरण कोव्हीडनंतरच्या काळातही नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लाभदायी ठरणार आहे.