“हर घर दस्तक अभियान” अंतर्गत आता कोव्हीड लसीकरण नागरिकांच्या घरापर्यंत
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाल्यानंतर आता दुस-या डोसचे लसीकरण वेगाने व्हावे याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. सद्यस्थितीत 58.25 टक्के नागरिकांनी कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेतले असून उर्वरित नागरिकांपर्यंत जलदरित्या पोहचून त्यांना संपूर्ण लस संरक्षित करण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेने “हर घर दस्तक अभियान” प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली असून या अंतर्गत घरोघरी भेटी देऊन लसीकरण राहिलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी नागरी आरोग्य केंद्र पातळीवर आशा स्वयंसेविका, एएनएम यांच्यामार्फत गृहभेटी दिल्या जात असून त्यांच्या लसीकरणाबाबतची स्थिती जाणून घेण्यात येत आहे. ज्या नागरिकांचा पहिला किंवा दुसरा डोस राहिलेला आहे अशा नागरिकांची माहिती संकलीत करून त्यांचे त्याच ठिकाणी लसीकरण करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नियमितपणे राबविल्या जाणा-या मिशन इंद्रधनुष्य मोहिमेच्या धर्तीवर कोव्हीड लसीकरणाविषयीची माहिती घेऊन मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत सुरु असलेल्या विविध भागातील 343 लसीकरण जागांवर नियमित लसीकरणाचे दिवस वगळून उर्वरीत दिवशी कोव्हीड लसीकऱण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. या सत्रांच्या दिवशी त्या भागामध्ये ध्वनीक्षेपकाव्दारे आवाहन करण्यात येत असून आशा स्वयंसेविका व एएनएम यांच्यामार्फत संकलीत यादीतील लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना लसीकरणासाठी पाचारण करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेची 4 रुग्णालये, वाशी इएसआयएस रुग्णालय येथील जम्बो सेंटर, 23 नागरी आरोग्य केंद्रे, इनॉर्बिट मॉल वाशी व ग्रॅट सेंट्रल मॉल सीवूड येथील ड्राईव्ह इन लसीकरण, दाणा मार्केट व एपीएमसी मार्केट, जुईनगर रेल्वे कॉलनी हेल्थ युनिट याठिकाणी नियमितपणे लसीकरण सुरु असून याशिवाय रुग्णवाहिकांमध्ये रुपांतरित केलेल्या 10 एनएमएमटी बसेसव्दारे मार्केट, डेपो अशा वर्दळीच्या ठिकाणी कोव्हीड लसीकरण केले जात आहे. यामध्ये आता “हर घर दस्तक अभियान” अंतर्गत घरोघरी जाऊन लसीकरणाला वेग दिला जात असून विहित वेळेत नागरिकांनी दुसरा डोस घ्यावा याकरिता थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून प्रयत्न केले जात आहेत.
शासनाने सूचित केलेल्या “हर घर दस्तक” अभियानामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या लसीकरणाला अधिक वेग येईल व लवकरात लवकर दोन्ही डोस घेऊन नवी मुंबईकर नागरिक संरक्षित होतील असा विश्वास व्यक्त करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नागरिकांनी कोव्हीड पासून संपूर्ण संरक्षण मिळण्याकरिता लसीकऱणाचे दोन्ही डोस विहित कालावधीत लगेच घ्यावेत व हर घर दस्तक अभियानांतर्गत आपल्या घरी येणा-या महापालिका आरोग्य कर्मचा-यांना सत्य माहिती द्यावी असे आवाहन केले आहे.