मनोरंजन

पु.ल.देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्त दिलीप प्रभावळकर, अरूणा ढेरे, मिलिंद जोशी, आस्ताद काळे, प्रसाद ओक यांच्या आवाजातील पु.लंची ऑडिओबुक्स स्टोरीटेलमार्फत प्रकाशित!

8 नोव्हेंबर 2021 रोजी, पु. ल. देशपांडे यांची 102 वी जयंती आहे. त्यानिमित्त स्टोरीटेल मराठीवर पुलंच्या आगळ्यावेगळ्या पुस्तकांची भेट स्टोरीटेलच्या श्रोत्यांना मिळणार आहे. पुलंनी लिहिलेले वेगळ्या विषयांवरचे लेख, त्यांनी इतर कलावंत, साहित्यिकांना लेखनातून दिलेली ‘दाद’, तसेच त्यांचे काही हलकेफुलके व वैचारिक स्वरूपाचे लेखनही आहे. ‘विश्रब्ध शारदा’सारख्या अनेक पुस्तकांना त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना ‘चार शब्द’ या त्यांच्या वेगळ्या प्रकारच्या पुस्तकात समाविष्ट आहेत. याच पुस्तकातले ‘विश्रब्ध शारदा’ आणि ‘रंग माझा वेगळा’ हे दोन अत्यंत महत्वाचे लेख ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांनी स्टोरीटेलसाठी वाचले आहेत. ‘अपुर्वाई’ आणि ‘जावे त्यांच्या देशा’ यांसारखी खुमासदार प्रवासवर्णने  8 तारखेला श्रोत्यांच्या भेटीस येत आहेत. ‘अपुर्वाई’ हे पुस्तक अभिनेता आस्ताद काळे यांनी वाचलं आहे, तर ‘जावे त्यांच्या देशा’ या पुस्तकाची रंगत आवाजाद्वारे आणखी खुलवली आहे, ती अभिनेता प्रसाद ओक यांनी.

‘हसवणूक’ हे पुलंचं आणखी एक विनोदी पुस्तक. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी या पुस्तकातील निवडक लेख स्टोरीटेलवर सादर केले आहेत. तसेच ‘आमचा धंदा’, ‘माझे खाद्यजीवन’, ‘माशी’, ‘साता वारांची कहाणी’, ‘चाळिशी’, ‘रस्ते’ हे पुलंचे प्रभावळकरांनी सादर केलेले लेख श्रोत्यांना नक्की आवडतील.

तर ‘दाद’ या पुस्तकातील ‘एक दु:खाने गदगदलेले झाड’ आणि ‘कोसला वाचल्यावर’ हे लेख पुलंनी इतर व्यक्तींच्या उत्तम कार्याला मनापासून दिलेली पोचपावती आहेत. पुलंचा स्वभावच तसा, गुणग्राही आणि उत्तम कलेला, कलाकाराला मनस्वी दाद देणारा. या त्यांच्या उमद्या स्वभावातून आणि व्यासंगातून त्यांनी अनेक थोर व्यक्तींच्या कार्याची महती सांगणारी अत्यंत वाचनीय आणि अभ्यासपूर्ण स्फुटं लिहिली. ‘दाद’मधील ‘एक दु:खाने गदगदलेले झाड’ हा लेख स्टोरीटेलवर अरुणा ढेरे यांनी वाचला आहे, तर ‘कोसला वाचल्यावर…’ हा लेख मिलिंद जोशी यांनी सादर केला आहे.

पुलंच्या जन्मदिनानिमित्त या ऑडिओबुकच्या माध्यमातून श्रोत्यांना पुलंच्या साहित्याचा आनंद घेता येईल!

याखेरीज येत्या काळात ‘मैत्र’, ‘गणगोत’, ‘गुण गाईन आवडी’, ‘खिल्ली’, ‘उरलं-सुरलं’ आणि ‘पूर्वरंग’ ही ऑडियोबुक्सही लवकरच श्रोत्यांसाठी स्टोरीटेल मराठीवर नामवंतांच्या आवाजात  उपलब्ध होणार आहेत.

स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत  रू.९९९/- आहे. पण आता वार्षिक वर्गणी भरणा-यांसाठी स्टोरीटेलने अधिक सवलत जाहिर केली आहे आणि फक्त रू.३९९/-  वर्गणी  भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button