नवी मुंबई

नवी मुंबईत दिवाळीमध्ये रात्रीचे महास्वच्छता अभियान

निश्चय केला, नंबर पहिला हे ध्येय साध्य करण्यासाठी शहर स्वच्छतेबाबत जागरूक असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार दिवाळीत रात्री वाजविल्या जाणा-या फटाक्यांच्या मोठ्या प्रमाणावर होणा-या कच-यामुळे सकाळी दैनंदिन स्वच्छतेवर वाढणारा ताण लक्षात घेत 4 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपुजनाच्या रात्रीपासून पहाटेपर्यंत यशस्वीपणे महास्वच्छता अभियान राबविले. सकाळी लवकर जॉगींगसाठी बाहेर पडणा-या नागरिकांना रात्री एवढ्या मोठ्या प्रमाणात फटाके वाजल्यानंतरही पहाटे स्वच्छ रस्ते पाहून समाधान वाटले आणि अनेक जणांनी सोशल मिडियावर या विशेष मोहिमेची दखल घेत संदेश प्रसारण करीत कौतुक केले.

दिवाळीच्या दिवसांमध्ये विशेषत्वाने लक्ष्मीपूजनाच्या व अभ्यंगस्नानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर फटाके वाजविले जातात. रात्री उशीरापर्यंत फटाके वाजविले जात असल्याने सकाळी मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो. याचा ताण दुस-या दिवशीच्या स्वच्छता कार्यवाहीवर पडतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेत सर्व आठही विभागांमध्ये स्वच्छताकर्मींच्या समुहांची रात्रीच्या सफाईसाठी नेमणूक करण्यात आली.

रात्री 11 वाजता स्वच्छतेची शपथ घेत सर्व आठही विभागांमध्ये महास्वच्छता अभियानास सुरूवात करण्यात आली. पहाटे 4 वाजेपर्यंत 467 स्वच्छताकर्मींनी अथक मेहनत घेत रस्त्यांवर पडलेला फटाक्यांचाफुलांचा असा 32 टन 450 किलो कचरा संकलित केला. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे तसेच मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे व सर्व स्वच्छता अधिकारी, कर्मचारी संपूर्ण रात्रभर या कार्यवाहीवर लक्ष ठेवून होते. सकाळी स्वच्छ रस्ते पाहून नागरिकांनी या उपक्रमाची प्रशंसा करीत आनंद व्यक्त केला.   

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button