खालापुरात विश्वनिकेतन संस्थेमधील क्रीडा संकुलाचे उदघाटन
भविष्याचा विचार करून विद्यार्थ्यांनी विषय निवडावा – जिल्हाधिकारी मा. महेंद्र कल्याणकर
२९ ऑक्टोबर २०२१ : खालापूर जवळील विश्र्वनिकेतन शैक्षणिक संकुलामध्ये, मंगलम ऑरगॅनिक लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने क्रीडा संकुल साकारण्यात आले असून या क्रीडासंकुलाचे उद्घाटन रायगडचे जिल्हाधिकारी माननीय महेंद्र कल्याणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मंगलम ऑरगॅनिक लिमिटेड कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून व विश्वनिकेतन संस्थेच्या सहकार्याने या क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आली असून हे क्रीडा संकुल विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी मोलाचे ठरणार आहे.
क्रीडा संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी विश्वनिकेतन संस्थेच्या कार्याचे कौतुक करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार व भविष्याचा विचार करून पुढील शिक्षणासाठी शाखा निवडावी असा सल्ला दिला. यावेळी प्रांत अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार आयुब तांबोळी, खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते तसेच मंगलम ऑर्गनिक कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कमळ दुजाडवाला, पंकज दुजाडवाला ,कणीराज, सदानंद तांबोळी, बिनय झा, दत्तात्रेय घरत, विश्वनिकेतन संस्थेचे अध्यक्ष मधु भतीजा, उपाध्यक्ष डॉ. एस. एस इनामदार, सचिव सुनील बांगर, प्राचार्य डॉ. बी. आर. पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व प्रशासकीय अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. या क्रीडा संकुलामध्ये क्रिकेट, लॉन टेनिस, स्क्वॅश कोर्ट, बॅडमिंटन, बास्केट बॉल यासारख्या खेळाच्या सुसज्ज व पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. विश्वनिकेतन संकुलामध्ये रायगड जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई व अन्य भागातून जवळपास 2 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविण्यासाठी मदत होणार आहे.
या क्रीडा संकुलाच्या भव्य उदघाटन सोहळ्या निमित्ताने कार्यक्रमाच्या दरम्यान प्रास्ताविक सादर करताना विद्यालयाचे उपाध्यक्ष डॉ. संदीप इनामदार यांनी विश्वनिकेतन शैक्षणिक संस्थेचे अभियांत्रिकी व आर्किटेक्चर महाविद्यालये त्यांच्या स्थापनेपासूनच “प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग” मॉडेल राबवून शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल घडवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले तसेच उत्कृष्ट पायाभूत सुविधा, सुसज्ज हॉस्टेल व बस ट्रान्सपोर्ट, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये परदेशी विद्यापीठांमध्ये मिळणारी नवीन टेक्नॉलॉजीच्या प्रशिक्षणाची संधी, अद्यावत प्रयोगशाळा आणि अनुभवी शिक्षणतज्ञांच्या उत्कृष्ट मिश्रणासारख्या दर्जेदार वैशिष्ट्यांसाठी सतत प्रयत्न केल्यामुळे, विश्वनिकेतन ही संस्था नावारूपाला येत असल्याचे सांगितले.
तर जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आपण ही सर्वसामान्य विद्यार्थी होतो मात्र शैक्षणिक वाटचाल करताना आवडत्या विषयातच जास्तीतजास्त लक्ष देऊन शैक्षणिक वाटचाल केली आणि जिल्हाधिकारी पदावर पोहचलो त्यामुळे आपल्या आवडीनुसार विषय निवडून भविष्याची वाटचाल करावी असे मत कल्याणकर यांनी व्यक्त करीत विद्यर्थांना मोलाचा सल्ला दिला व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आभार विश्वनिकेतनचे चेरमन मधु भतीजा यांनी मानले