नवी मुंबई

अतिवृष्टीनंतरच्या मदतकार्यातील नमुंमपा अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्रांचा मुख्यालयात विशेष सन्मान

जुलै महिन्यात कोकणासह इतर भागाला बसलेल्या जलवृष्टीच्या तडाख्यातून तेथील जनजीवनाला मदतीचा हात देण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशाप्रमाणे तत्पर कार्यवाही करीत नवी मुंबई महानगरपालिकेची स्वच्छता, वैद्यकीय, अग्निशमन पथके महाड. चिपळूण, कोल्हापूर भागात आवश्यक साधनसामुग्री व औषधसाठ्यासह रवाना झाली. त्यांनी समर्पित भावनेने त्याठिकाणी केलेल्या अथक मदतकार्याची दखल तेथील नागरिक, लोकप्रतिनिधी, स्थानिक  प्राधिकरणे तसेच प्रसार माध्यमांकडूनही मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली. तेथील नागरिकांनी सोशल मिडीयावरूनही नवी मुंबई महानगरपालिकेच्या पथकांच्या सेवाभावी कामाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले.

अशाप्रकारे इतरांच्या अडचणीच्या प्रसंगात धाव घेत त्याठिकाणी सेवाभावी वृत्तीने मदतकार्य करणा-या पथकातील अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाचा महानगरपालिकेमार्फतही सन्मान व्हावा या भूमिकेतून महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथएटरमध्ये 374 स्वच्छताकर्मी आणि 30 महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच 11 वैद्यकीय पथकातील डॉक्टर्स, ब्रदर व सहकारी त्याचप्रमाणे 11 अग्निशमन अधिकारी व जवान अशा 400 हून अधिक आपत्कालीन मदतकार्य पथकात सहभागी अधिकारी, कर्मचारी, स्वच्छताकर्मी यांचा स्नेहभेट व प्रशस्तिपत्र देऊन  विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त डॉ. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा मदतकार्य कार्यवाहीचे नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, उपआयुक्त सर्वश्री मनोजकुमार महाले, जयदीप पवार, डॉ. श्रीराम पवार, ऐरोलीचे विभाग अधिकारी श्री. महेंद्र सप्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आहेर, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेद्र सोनावणे, उपमुख्य स्वच्छता अधिकारी श्री. विनायक जुईकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.  

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकांनी पूरग्रस्त भागात सेवाभावी वृत्तीने केलेल्या कामामुळे महानगरपालिकेची मान उंचावलेली असून याची दखल घेत आयुक्त महोदयांच्या संकल्पनेतून या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी सांगितले. हे मदतकार्य सर्वांनाच अधिक चांगल्या कामाची प्रेरणा देणारे असून आजचा हा सन्मान सोहळा आपल्यातील जिव्हाळ्याचे नाते घट्ट करणारा कौटुंबिक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.  

याप्रसंगी आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत प्रदूषणमुक्त स्वच्छ व पर्यावरणशील दिवाळी साजरी करण्याची सामुहिक शपथ अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांचेसमवेत सर्वांनी घेतली. महापालिका प्रशासनाने चांगल्या कामाची दखल घेऊन विशेष सत्कार केल्याबद्दल सत्कारमूर्तींनी समाधान व्यक्त केले व यामुळे अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा मिळाल्याचे नमूद केले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button