नवी मुंबई

आता कोव्हीड 19 दुस-या डोसचे जलद लसीकरण करून नवी मुंबई संपूर्ण लस संरक्षित करण्याचे लक्ष्य

कोव्हीड 19 लसीच्या पहिल्या डोसची 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करणारे एम.एम.आर.क्षेत्रातील नवी मुंबई हे पहिले शहर असल्याचा आनंद व्यक्त करतानाच आता कोव्हीड लसीच्या दुस-या डोसचे लसीकरण पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व महापालिका रूग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक तसेच सर्व नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी वेबसंवाद साधत याविषयी नियोजनबध्द कार्यवाही करण्याचे निर्देशित केले आहे.

ज्या नागरिकांनी कोव्हीशील्ड लसीचा पहिला डोस घेतलेला आहे त्यांनी 84 दिवसानंतर दुसरा डोस घ्यावा तसेच ज्यांनी कोव्हँक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांनी 28 दिवसानंतर दुसरा डोस घ्यावा याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत आरोग्य विभागास देण्यात आले आहेत.

याकरिता नागरी आरोग्य केंद्रांकडे उपलब्ध असलेल्या दैनंदिन लसीकरणाच्या यादीनुसार 84 दिवस आधी कोव्हीशील्ड तसेच 28 दिवस आधी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेणा-या व्यक्तींना त्यांचा दुसरा डोस घेण्याचा विहित कालावधी पूर्ण झाल्याचे सूचित करून त्यांना दुसरा डोस घेण्यासाठी पाचारण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

याशिवाय कोव्हीड प्रभावित कालावधीत रूग्णसंपर्क तसेच बेड्स व रूग्णवाहिका उपलब्धतेमध्ये नागरिकांना अत्यंत उपयोगी ठरलेल्या महानगरपालिकेच्या कोव्हीड कॉल सेंटरकडे लसीकरणाचा पहिला डोस झालेल्या नागरिकांची यादी उपलब्ध करून देण्यात आली असून कॉल सेंटरमार्फतही विहित कालावधीनंतर दुसरा डोस घेण्याबाबत नागरिकांना सूचित करण्यात येणार आहे. कॉल सेंटरमार्फत दिवसाला 10 हजार नागरिकांना दूरध्वनी करण्यात येणार आहेत व दुस-या डोससाठी आवाहन करण्यात येणार आहे.

आत्तापर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेची लसीकरण केंद्रे व खाजगी रूग्णालये याठिकाणी 11 लाख 17 हजार 685 नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतलेला असून 5 लाख 97 हजार 653 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला आहे.

यामध्ये –

अशाप्रकारे 17 लाख 15 हजार 338 लसीचे डोस देण्यात आलेले आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दैनंदिन लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केले जात असून दुस-या दिवशीच्या लसीकरणाची माहिती आदल्या दिवशी संध्याकाळी व्हॉट्स ॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा सोशल माध्यमांवरून तसेच nmmccovidcare.com या पोर्टलवर प्रसिध्द करण्यात येत आहे.

तरी नवी मुंबईकर नागरिकांनी आपला कोव्हीड लसीचा पहिला डोस घेऊन विहित कालावधी पूर्ण झाल्यावर लगेच नजिकच्या महानगरपालिका लसीकरण केंद्रावर जाऊन आपला दुसरा डोस घ्यावा व संपूर्ण लस संरक्षित व्हावे. जरी खाजगी रूग्णालयात पहिला डोस घेतला असेल तरी दुसरा डोस महापालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रावर विनामूल्य उपलब्ध आहे याची नोंद घ्यावी असे सूचित करीत लसीकरण झाल्यानंतरही मास्क, सुरक्षित अंतर व नियमित हात स्वच्छ ठेवणे हीच कोव्हीडपासून बचावाची सुरक्षा त्रिसूत्री आहे याचा विसर पडू न देता ती आपली नियमित सवय ठेवावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button