“मिशन युवा स्वास्थ्य” मोहिमेमध्ये पहिल्याच दिवशी 10 महाविद्यालयात 407 विद्यार्थ्यांचे लसीकरण
महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरु व्हावीत यादृष्टीने कोव्हीड लसीकरणाला वेग देत महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मिशन युवा स्वास्थ्य मोहिम हाती घेण्यात आली असून नवी मुंबई महानगरपालिकेने आज 22 ऑक्टोबरपासूनच 10 महाविद्यालयांमध्ये लसीकरणाला सुरुवात केलेली आहे. शासनाने दिलेल्या उद्दीष्टानुसार 18 वर्षावरील 100 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणारे नवी मुंबई हे एमएमआर क्षेत्रातील पहिले शहर असून आता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयीन लसीकरणावर लक्ष केंद्रीत करत त्याठिकाणी विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येत आहेत.
महाविद्यालयीन लसीकरणाच्या आजच्या पहिल्या दिवशी 10 महाविद्यालयांमध्ये 407 विद्यार्थ्यांचे लसीकऱण करण्यात आले असून यामध्ये यामध्ये टिळक एज्युकेशन सोसायटी, एस.के. कॉलेज, सेक्टर 25 नेरुळ – 30 विद्यार्थी, आयसीएल कॉलेज, सेक्टर 9 ए, वाशी – 50 विद्यार्थी, वाय.सी. कॉलेज, सेक्टर 15, कोपरखैरणे- 35 विद्यार्थी, टिळक कॉलेज, सेक्टर 28, वाशी – 50 विद्यार्थी, स्टर्लिंग कॉलेज, सेक्टर 19 नेरुळ – 20 विद्यार्थी, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सेक्टर 22, नेरुळ – 19 विद्यार्थी, मॉर्डन कॉलेज, सेक्टर 16ए वाशी – 137 विद्यार्थी, शेतकरी शिक्षण संस्था विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज घणसोलीगांव – 26 विद्यार्थी, भारती विद्यापीठ, सेक्टर 3, सीबीडी बेलापूर – 10 विद्यार्थी, इंडियन एरोस्पेस आणि इंजिनियरिंग कॉलेज, तुर्भे एम.आय.डी.सी. – 30 विद्यार्थी अशाप्रकारे 407 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.
2 नोव्हेंबर पर्यंत “मिशन युवा स्वास्थ्य” मोहिम सर्व महाविद्यालयांमध्ये राबविली जात असून पहिला व दुसरा कोव्हिशिल्ड डोस तसेच कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जात आहे. कॉलेजमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच प्राध्यापक, प्राध्यापिका आणि इतर कर्मचारी यांचेही या मोहिमेमध्ये लसीकरण केले जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत 11 लाख 11 हजार 154 नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतला असून 5 लाख 83 हजार 463 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण व्हावेत याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने नियोजन केले असून कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोसची तारीख होऊन 84 दिवस झालेल्या नागरिकांना दूरध्वनी करून दुसरा डोस घ्यावा म्हणून सूचित करण्यात येत आहे. पहिल्या डोसप्रमाणेच दुस-या डोसचेही उद्दीष्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावे हा प्रयत्न असून यादृष्टीने विविध माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
तरी नवी मुंबईकर नागरिकांनी आपला पहिला डोस घेऊन विहित कालावधी पूर्ण झाल्यानंतर लगेचच नजीकच्या महानगरपालिका लसीकऱण केंद्रावर जाऊन लसीचा दुसरा डोस त्वरीत विनामूल्य घ्यावा असे सूचित करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आगामी उत्सवी कालावधी बघता कोव्हीड सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले आहे.