नवी मुंबई

‘मिशन कवच कुंडल’ मोहिम नवी मुंबईत यशस्वी

‘मिशन कवच कुंडल’ मोहिम नागरिकांच्या उत्तम प्रतिसादात नवी मुंबईत यशस्वी

‘लसीकरण आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत 4 दिवसात 7234 नागरिकांचे घराजवळ कोव्हीड 19 लसीकरण

कोव्हीड 19 लसीकरणामध्ये नवी मुंबई महानगरपालिका सुरूवातीपासूनच आघाडीवर असून शासनामार्फत देण्यात आलेले पहिल्या डोसचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. आत्तापर्यंत 18 वर्षांवरील 99.63% नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतलेला असून 51.30 % नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणारी नवी मुंबई ही एमएमआर क्षेत्रातील अग्रणी महापालिका आहे. 

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ तसेच इतर सर्व मोहीमांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने सर्वोत्तम कामगिरी केलेली असून दि. 11 ते 14 ऑक्टोबर  या कालावधीत राबविण्यात आलेल्या   ‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेमध्येही अत्यंत उत्तम कामगिरी केलेली आहे. या मोहीमेअंतर्गत महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लसीकरण आपल्या दारी’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली. ज्यामध्ये 4 रुग्णवाहिका तसेच रूग्णवाहिकेमध्ये रूपांतरित केलेल्या 8 बसेस स्वरूपातील रूग्णवाहिका अशा 12 रूग्णवाहिकांव्दारे दर दिवशी 48 वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्रत्येक रूग्णवाहिका दर दिवशी 9 ते 11, 11 ते 1, 2 ते 4 आणि 4 ते 6 अशा वेळांमध्ये निश्चित केलेल्या ठिकाणी उभी करून नियोजनबध्द रितीने कोव्हीड लसीकरण करण्यात आले.

या मोहिमेअंतर्गत लसीकरण करताना महानगरपालिकेच्या विद्यमान 101 लसीकरण केंद्रांपासून काहीशी दूर अंतरावर असलेली ठिकाणे निवडून तेथे लसीकरणास प्राधान्य देण्यात आले. यात दुर्गम कॉरी भागातही रूग्णवाहिका नेऊन लसीकरण करण्यात आले. नागरिकांना अगदी घराजवळ कोव्हीडची लस उपलब्ध झाल्याने या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

11 ऑक्टोबरला 1335 नागरिकांनी 12 ऑक्टोबरला 1570 नागरिकांनी, 13 ऑक्टोबरला 1834 नागरिकांनी व 14 ऑक्टोबरला 2494 नागरिकांनी अशाप्रकारे 4 दिवसात 7233 नागरिकांनी ‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेअंतर्गत 12 रूग्णवाहिकांव्दारे 192 स्पॉटवर करण्यात आलेल्या ‘लसीकरण आपल्या दारी’ उपक्रमाचा लाभ घेत ही मोहीम यशस्वी केली.

यामध्ये, 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात 4 दिवसात झालेले लसीकरण पाहता सीबीडी नागरी आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात 260, सेक्टर 48 नेरूळच्या क्षेत्रात 430, शिरवणेच्या क्षेत्रात 260, इंदिरानगर क्षेत्रात 480, तुर्भे क्षेत्रात 270, वाशीगाव सेक्टर 1 क्षेत्रात 160, महापे क्षेत्रात 740, खैरणे क्षेत्रात 552, पावणे क्षेत्रात 511स राबाडे क्ष्तारात 170, करावे क्षेत्रात 160, नेरूळ 1 क्षेत्रात 248, नेरूळ 2 क्षेत्रात 134, कुकशेत क्षेत्रात 60, सानपाडा क्षेत्रात 170, जुहूगांव क्षेत्रात 568, घणसोली क्षेत्रात 550, नोसील नाका क्षेत्रात 160, कातकरीपाडा क्षेत्रात 300, ऐरोली क्षेत्रात 220, चिंचपाडा क्षेत्रात 360, दिघा क्षेत्रात 260 व इलठणपाडा क्षेत्रात 210 अशाप्रकारे 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात 7233 इतके लसीकरण झालेले आहे.

रूग्णवाहिका लसीकरणासाठी कोणत्या स्पॉटवर कोणत्या वेळेत उभी असणार आहे याची नागरिकांना माहिती होण्यासाठी संबंधित नागरी आरोग्य केंद्रांमार्फत त्या परिसरात माईकींगव्दारे माहिती प्रसारण व जनजागृती करण्यात आली तसेच प्रत्येक जागेवर लाभार्थ्यांना लसीकरणासाठी आणण्याकरिता 3 ते 4 स्वयंसेवक सज्ज होते. यामुळे इतक्या चांगल्या प्रमाणात लसीकरण झाले.

नवी मुंबई शहरातील कोणीही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये याची काळजी घेत बेघर व निराधार व्यक्तींचे यापूर्वीच लसीकरण करण्यात आले असून पहिल्या डोसच्या वेळी विशेष संगणकीय प्रणालीवर घेतलेले त्या व्यक्तीचे बोटांचे ठसे पडताळून त्यांना दुसरा डोस देण्याची कार्यवाही सध्या शहरात सुरू आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा व्यक्तीही लसीकरणापासून वंचित राहू नयेत याची काळजी घेत त्यांच्याकरताही विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये आत्तापर्यंत 159 आधारकार्ड नसलेल्या व्यक्तींनी लसीकरणाचा लाभ घेतलेला आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लसीकरणात एक दिवसही खंड पडू न देता अगदी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही लसीकरण सत्रे सुरू ठेवण्यात येत असून ज्या नागरिकांनी अद्याप लस घेतलेली नाही त्यांनी त्वरित आपल्या नजिकच्या महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर जाऊन विनामूल्य लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button